Pune Double Decker PMPML Buses: पुण्यात पहिल्यांदाच धावणार डबल डेकर बस, हिंजवडी, मगरपट्टा आणि खराडीत ट्रायल

Pune Double Decker PMPML Buses: पुण्यातील नवीन इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस पूर्णपणे वातानुकूलित (Air-conditioned) असून, लंडनच्या iconic लाल बसेससारख्या असणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चालली असून, पुण्यात वाहने चालवणे हे एक आव्हान बनले आहे. पुण्यातील सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यासाठी गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबईप्रमाणे पुण्यातही डबल डेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी या डबल डेकर बस रस्यावर उतरवण्यात येणार असून त्यांची चाचणी धाव घेण्यात येणार आहे (PMPML Double Decker Bus Trial) हिंजवडी, मगरपट्टा आणि खराडी भागामध्ये ही ट्रायल घेण्यात येणार आहे. एकाचवेळी अधिकाधिक प्रवाशांना वाहून नेल्यास सार्वजनिक वाहतुकीवर येणारा ताण कमी करणे शक्य असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबईतील डबल डेकर बसप्रमाणेच पुण्यातल्या डबल डेकर बस या देखील लाल रंगातील असतील आणि त्याही पूर्णपणे एसी असतील. विशेष म्हणजे या बसेस इलेक्ट्रीक बस असणार आहेत. प्रायोगिक तत्वावरील धाव यशस्वी झाल्यानंतर या सेवेचा विस्तार करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.  

नक्की वाचा: मुसळधार पावसामुळे वाहतुकीचे तीनतेरा, ठिकठिकाणी पाणा साचल्याने मोठी वाहतूक कोंडी

PMPMLची 'स्विच'सोबत हातमिळवणी

पीएमपीएलने पुण्यात इलेक्ट्रीक डबल डेकर बस सुरू करण्यासाठी अशोक लेलँडची इलेक्ट्रिक वाहन शाखा असलेल्या 'स्विच मोबिलिटी' (Switch Mobility) सोबत हातमिळवणी केली आहे. पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांच्या आणि 'स्विच मोबिलिटी'च्या प्रतिनिधींच्या बैठका झाल्या होत्या, ज्यातून हिंजवडी, मगरपट्टा आणि खराडी भागात ट्रायल घेण्यात यावी असे ठरले होते. 'स्विच मोबिलिटी'च्या पथकानेही या भागातील मार्गांची पाहणी केली असल्याचे कळते आहे. 

नक्की वाचा: IAS पूजा खेडकरचे कुटुंब पुन्हा वादात! मुंबईतून गायब झालेला व्यक्ती पुण्यातील घरात सापडला

कशी आहे पुण्याची पहिली डबल डेकर बस?

या नवीन इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस पूर्णपणे वातानुकूलित (Air-conditioned) असून, लंडनच्या iconic लाल बसेससारख्या असणार आहेत. यापूर्वी अशा बस मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेल्या असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या डबल डेकर बसमध्ये एकाच वेळी 70 प्रवासी बसू शकतात, तर 40 प्रवासी उभे राहू शकतात. याचा अर्थ एकावेळी 100 हून अधिक प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होईल. ही क्षमता सध्याच्या सामान्य बसेसच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. या बसेसची उंची 14 फूट 4 इंच असल्यामुळे त्यांना पुणे मेट्रोच्या मार्गांचा किंवा शहरातील कोणत्याही उड्डाणपुलांचा अडथळा निर्माण होणार नाहीत.या बसेसची किंमत अंदाजे 2 कोटी रुपये आहे. जुन्या डिझेल डबल-डेकर बसेसच्या तुलनेत या बसेसचा देखभाल खर्च कमी. इलेक्ट्रीक बस असल्यामुळे या डबल डेकर बसेसमुळे प्रदूषण होणार नाही.