- अविनाश पवार, प्रतिनिधी
Shivneri Fort Stampede News: छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथील ऐतिहासिक शिवनेरी गडावर शिवजयंतीच्या (Shiv Jayanti 2026) उत्सवात मोठी दुर्घटना घडली. शिवजन्मोत्सवाचा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त गडावर दाखल झाले होते, पण वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला अपयश आल्याने अंबरखाण्याच्या परिसरात मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत महिला आणि लहान मुलांसह अनेक नागरिक जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिवनेरी गडावर नेमकं काय घडलं?
शिवजयंतीनिमित्त (Shiv Jayanti 2026 News) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवनेरीवर शिवज्योत घेऊन येणारे तरुण, विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच शिवजन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी उसळली होती. मध्यरात्रीपासूनच गडाच्या रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. पण वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली. अंबरखाण्याच्या खालील हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा यासारख्या अरुंद मार्गांवर एकाच वेळी मोठ्या संख्येने शिवभक्त जमल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली.
(नक्की वाचा: Shiv Jayanti 2026 Wishes 25+: सह्याद्रीचा सिंह गर्जतो! शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश)
नियोजन कोलमडले, पोलीस बंदोबस्त अपुरा
या घटनेत काही महिला आणि लहान मुलांसह अनेक नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळालीय. जखमींना तातडीने जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण या घटनेमुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिवजयंतीसारख्या मोठ्या उत्सवावेळी दरवर्षी मोठी गर्दी होत असल्याने भविष्यात योग्य गर्दी नियंत्रण, प्रवेश-निर्गमन मार्गांचे नियोजन आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त हा आदल्या दिवसापासूनच गडावर ठेवणे गरजेचे आहे.
(नक्की वाचा: Shiv Jayanti 2026 Speech: शिवरायांचा इतिहास ऐकून श्रोत्यांच्या अंगावर शहारे येतील, शिवजयंतीला करा धडाकेबाज भाषण)
शिवजयंती (Shivneri Fort Stampede News) हा राज्याचा मोठा सण असूनही, दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने खबरदारी का घेतली नाही? असा संतप्त सवाल आता शिवभक्तांकडून विचारला जात आहे. पुढील काळात अशा दुर्घटना टाळण्यासाठी गडावर कायमस्वरूपी गर्दी व्यवस्थापन यंत्रणा राबवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.