अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune Manchar Religious Dispute News: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात दर्गा आणि पांडवकालीन बारव यावरून निर्माण झालेला वाद आता पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वादाने आता गंभीर वळण घेतले असून संपूर्ण परिसरात कमालीचा तणाव पाहायला मिळत आहे.
हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या दाव्यांमुळे आणि प्रशासकीय हालचालींमुळे मंचरमधील वातावरण सध्या अत्यंत संवेदनशील बनले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेतली जात असून परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पांडवकालीन बारव आणि वक्फ बोर्डाचा दावा
मंचरमधील या वादाच्या केंद्रस्थानी आता पांडवकालीन बारव आली आहे. ही ऐतिहासिक बारव वक्फ बोर्डाने आपल्या ताब्यात घेतल्याचा खळबळजनक आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे. इतकेच नाही तर या बारवीच्या अगदी शेजारी असलेला दर्गा पूर्णपणे अनधिकृत असल्याचा दावाही या संघटनांनी केला आहे.
यामुळे स्थानिक पातळीवर दोन गटांमध्ये मतभेदाची ठिणगी पडली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या बारवीच्या ऐतिहासिक वारशावरून सुरू झालेल्या या नव्या वादाने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
( नक्की वाचा : Khamenei Death: डेंटिस्ट बनून आले अन् खामेनींना संपवून गेले! मोसादच्या ऑपरेशनचा थरार वाचून डोकं चक्रावेल )
खासदारांची भेट आणि प्रशासकीय कारवाई
या सर्व प्रकरणाची दखल घेत राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी (6 मार्च 2026) प्रत्यक्ष मंचरला भेट दिली. त्यांनी वादग्रस्त ठरलेल्या दर्ग्याची आणि पांडवकालीन बारव परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक प्रांत अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित दर्ग्याच्या बांधकामाबाबत तातडीने चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
खासदारांच्या या दौऱ्यानंतर प्रशासनाने वेगाने पावले उचलत खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित दर्ग्याला कुलूप लावले आहे. यामुळे या प्रकरणाला आता राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.
( नक्की वाचा : Maharashtra Budget 2026: पुणे मेट्रो आता सासवड, वाघोलीच्या दारात; बजेटमध्ये पुण्याच्या पायाभूत सुविधांचा धमाका )
मशिदीखालील बांधकामामुळे आधीच वाढला होता तणाव
मंचरमध्ये हा वाद निर्माण होण्यामागे काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना कारणीभूत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात एका मशिदीजवळ रस्त्याचे काम सुरू असताना मशिदीच्या भिंतीचा काही भाग अचानक कोसळला होता. यावेळी मशिदीच्या खाली भुयारासारखी रचना दिसून आली होती, ज्यामुळे परिसरात तर्कवितर्कांना उधाण आले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी तिथे मंदिर असल्याचा दावा केला होता. जरी त्यावेळी प्रशासनाने तपासणी करून काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे स्पष्ट केले होते, तरीही त्या घटनेने लोकांच्या मनात संशयाचे वातावरण कायम ठेवले होते.
प्रशासनाचे शांततेचे आवाहन आणि पोलीस बंदोबस्त
सध्याची परिस्थिती पाहता मंचरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन हाय अलर्टवर आहे. प्रशासनाकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. दोन्ही बाजूंच्या नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहरात शांतता राखावी, असे आवाहन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world