Pune News : नीट प्रश्नपत्रिका फुटीचा खरा 'गॉड'फादर कोण? 'त्या' व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटमुळे प्रकरणाला नवं वळण

नीटच्या पेपरफुटी प्रकरणाला आता गॉड नावाच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटमुळे नवं वळण लागलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News : नीटच्या पेपरफुटी प्रकरणाला आता गॉड नावाच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटमुळे नवं वळण लागलं आहे. अटक करण्यात आलेल्या मनिषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने एक फोन नंबर सेव्ह करण्यात आला आहे. या क्रमांकासोबतचं संशयास्पद चॅट सीबीआयला आढळून आलं आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटीचा खरा गॉडफादर कोण, याचा तपास आता वेगाने सुरू झाला आहे.

तपास यंत्रणांच्या हाती पुरावे लागू नयेत म्हणून मनीषा हवालदारने भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या नोट्स जाळून टाकल्या. तसंच पुण्यातील शिवाजीनगरमधील मॉडर्न महाविद्यालयाच्या कनिष्ठ विज्ञान शाखेच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्यासोबतचं चॅटही डिलीट केल्याचं सीबीआयच्या सूत्रांनी म्हटलं आहे. हवालदारने पतीच्या मोबाईलवरुन मनिषा मांढरेला प्रश्न पाठवल्याचं सीबीआयला दिसून आलं आहे. मनिषाने इतरही काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा सीबीआयला संशय आहे.

Advertisement

नक्की वाचा - NEET Paper Leak : पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंग डिलीट; पुरावे मिटवण्यासाठी मनिषा हवालदारने वापरली 'ही' शक्कल

मनिषाच्या पतीच्या मोबाइलमधील पेपरफुटीचा म्होरक्या कोण?

मनिषा हवालदारने भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न काही विद्यार्थ्यांना आणि सहआरोपींना दिल्याचं मान्य केल्याचं सीबीआयच्या सूत्रांनी म्हटलंय. हे प्रश्न व्हॉट्सअ‍ॅप आणि प्रिंटआउटच्या माध्यमातून पुढे पाठवण्यात आले. या कामासाठी रोख रक्कम घेण्यात आली. शेठ हिरालाल सराफ प्रशालेतील अधिकृत प्रिंटरवरून प्रश्नांचं प्रिंटआउट काढल्याची कबुलीही मनिषाने दिली आहे. मनिषा हवालदारला दोन लाख रुपये पगार होता. गेल्या 23 वर्षांपासून सदाशिव पेठेतल्या लक्ष्मी निवास इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर राहते. सीबीआयने या प्रकरणी 12 जणांना अटक केली आहे. मात्र मनिषाच्या पतीच्या मोबाइलमध्ये तरी पेपरफुटीचा म्होरक्या कोण आहे? याचं उत्तर अद्याप मिळालं नाही. मनिषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमधल्या गॉडसोबतचच्या चॅटवरुन सीबीआयने संशय व्यक्त केला आहे. हे चॅट डिकोड केल्यानंतर पेपरफुटी प्रकरणातला खरा गॉडफादर समोर येण्याची शक्यता आहे.