Saint Tukaram Maharaj Palkhi: संत तुकोबांच्या अश्वांचं दुसरं रिंगण कसं पार पडलं? वाचा प्रत्येक अपडेट

यानंतर बाबुळगावकरांचा अश्व आणि अकलूजच्या मोहिते पाटलांच्या अश्वाचे रिंगणात आगमन झालं.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

देवा राखुंडे

पुण्याच्या इंदापूर मधील रयत शिक्षण संस्थेच्या सौ कस्तराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात आज संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं दुसरं गोल रिंगण पार पडलं. यात वारकऱ्यांसोबत देहू पासून पंढरीपर्यंत कर्तव्य बजावणारे पोलीस देखील धावले. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर वारकरी महिलांसह पोलिसांनी ही फुगडी खेळून आनंद उत्सव साजरा केला. देहू पासून प्रस्थान झाल्यापासून मजल दरमजल करत लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात. ऊन वारा पाऊस झेलत वारकऱ्यांसमवेत पोलीस देखील रात्रंदिवस मैदानात असतात. त्यामुळे कुठेतरी कामाचा शीण आलेला असतोच. हाच शीण झटकून टाकण्यासाठी पालखी सोहळ्याच्या वतीने आज इंदापूर मधील रिंगण सोहळ्यात पोलीस कर्मचाऱ्यांनाही धावण्याचे आवाहन करण्यात आलं. यात पोलीस कर्मचाऱ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इंदापूर मधील रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास पार पडला. तुकाराम तुकारामच्या जयघोषात सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी खांद्यावरती झेंडा घेत सर्वप्रथम प्रदक्षिणा घातली. त्यानंतर डोक्यावरती तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला बोला पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय असा जयघोष करीत मैदानातून धावल्या. लागलीच त्यांच्या पाठोपाठ विणेकाऱ्यांनी ही आपलं रिंगण पूर्ण केलं. यानंतर पालखी सोहळ्याच्या वतीने पोलिसांना ही रिंगणात धावण्याचा आवाहन करण्यात आले, यामध्ये पोलिसांनी सहभागी होत तुकाराम च्या जयघोष करत धावतच रिंगण पूर्ण केलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Monsoon Session 2025: पावसाळी अधिवेशन गाजणार, सत्ताधाऱ्यांची कोंडी होणार? सरकारच्या चहापानावर बहिष्कार

यानंतर बाबुळगावकरांचा अश्व आणि अकलूजच्या मोहिते पाटलांच्या अश्वाचे रिंगणात आगमन झालं. दोन्ही अश्वांच पूजन झाल्यानंतर अश्वांना रिंगणाचा मार्ग दाखवण्यात आला. त्यानंतर रिंगण सोहळ्याला प्रत्यक्षात सुरुवात झाली. मैदानात एकच जल्लोष झाला. बाबुळगावकरांचा अश्व पुढे धावला तर त्या पाठोपाठ मोहिते पाटलांचा अश्व धावत होता. बाबुळगावकरांच्या अश्वावरती स्वतः जगद्गुरु तुकोबाराय बसलेले असतात अशी वारकऱ्यांची धारण आहे. तर पाठीमागे धावणाऱ्या मोहिते पाटलांच्या अश्वावरती  चोपदार बसलेला असतो. हरिनामाच्या जयघोशात बघता बघता हा रिंगण सोहळा पार पडला आणि डोळ्याचं पारणं फिटलं.

Advertisement

ट्रेडिंग बातमी - Ajit Pawar: माझं ठरलं होतं, बंगला बांधल्याशिवाय..' अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितला लग्नाचा किस्सा

रिंगण पार पडताच रिंगण सोहळ्याच्या मैदानात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचाही आनंद गगनात मावत नव्हता. वारीत सहभागी झालेल्या महिलांनी आणि कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी फुगडी खेळून आनंद साजरा केला. देहू पासून आता पंढरीपर्यंत सेवा बजावत असताना कधीही ताण तणाव नव्हता माऊली माऊली करत आम्ही इथपर्यंत पोहोचलो, आतापर्यंत खूप सुखकर प्रवास झाला असून या वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आम्हाला मोठा आनंद मिळतो, अंगातील मरगळ झटकली जाते अशी प्रतिक्रिया पोलीस बांधवांनी दिली.

Advertisement