
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला महायुती सरकारने विरोधकांसाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांना बरिष्कार टाकण्याता निर्णय घेतला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना दानवे यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले. त्यामुळे या अधिवेशनात महायुती सरकारीची खरी परिक्षा असणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे असं यावेळी अंबादास दानवे यांनी सांगितलं. विधीमंडळाच्या कामकाजच्या दृष्टीने मविआची बैठक पार पडली असं ही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चहापानाचं निमंत्रण दिलं होतं. आम्हाला निमंत्रण दिलं असताना राज्याची स्थिती काय आहे हे आम्ही पाहिली. शेतकरी, तरुण, महिला अत्याचार, कायदा आणि सुव्यवस्था हे सगळे प्रश्न राज्यात गंभीर होत चालले आहेत. त्यामुळे अशा सरकारचं चहापान घेणं आम्हाला पटण्यासारखं नाही. महायुतीत तीन पक्षाची तोंड ही तीन दिशेला आहेत. एक मंत्री म्हणतात नारायण राणे यांनी मर्डर केला. या सरकारमध्ये एका मंत्र्याने 3 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. याची चिरफाड आम्ही अधिवेशनात करू असा इशाराही यावेळी दानवे यांनी दिला.
सत्ताधारी पक्षाची मस्ती वाढली आहे. बबनराव लोणीकर हे मंत्री ब्रिटिशांची सुधारित औलाद आहे. संजय शिरसाठ, भुमरे यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली आहेत. मराठी या भाषेवर अन्याय केला जात आहे. हिंदी सक्तीची केली जात आहे. शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत आहे. तरी सरकार हा प्रकल्प करत आहे. ड्रग्सचा विळखा या राज्याला बसला आहे. हे सगळं वाढत चाललं आहे. या सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहीलेली नाही. सत्ताधारी पक्षाचे लोकं गुन्ह्यात सहभागी आहेत. मुख्यमंत्री याला प्रोत्साहन देतात असा आरोही दानवे यांनी केला. त्यामुळे या सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकायचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.
आदित्या ठाकरे यांनी ही यावेळी सरकारवर जोरदार टीका केली. आम्ही विचार करत होतो या कार्यक्रमाला जायचं की नाही. पण यांच्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे पाप आहे. एक भाजप पक्ष आणि दोन गद्दार गँग यांचं हे सरकार आहे. या सरकारमध्ये बंगल्यावरून भांडणं आहेत. जिल्ह्याच्या वाटपावरून भांडणं आहेत. फंडावरून एकमेकां बरोबर मारामाऱ्या आहेत. अकरावीच्या पहिल्या प्रवेश यादीच घोळ आहे. यात दादा भुसे यांनी भ्रष्टाचार केला आहे का असा प्रश्न आता निर्णा होत आहे. याच भुसेंनी हिंदीची सक्ती लादली आहे. Msrdc खातं त्यांनी आधी सांभाळलं. त्यात समृद्धीत घोटाळा केला असा आरोपही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांचे कसे हाल या सरकारमध्ये सुरू आहेत यावर भाष्य केलं. बळीराजावर अन्याय करणारे हे सरकार आहे. आशा मनोवृत्तीच्या सरकारकडे चहापाण्याला आम्ही जाणार नाही. रोज खून आणि बलात्कार होत आहेत. पोलिसांचा धाक राहिलेला नाही. टक्केवारी आणि जिल्हे वाटपासाठी हे भांडत आहेत. एकमेकांच्या खात्यावर हे सगळे डोळा ठेऊन आहेत. जनतेच्या प्रश्नावर यांचा डोळा नाही. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस झाला. त्यात नुकसान झालं. एक रुपया ही शेतकऱ्याला दिला नाही. महिलांचे रक्षण या सरकारला करता येत नाही. असा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यामुळे हे अधिवेशन गाजणार हे नक्की आहे. विरोधकांच्या हाती सत्ताधाऱ्यां विरोधात अनेक प्रकरणं लागली आहेत. त्यामुळे याला सरकार आता कसं उत्तर देणार हे पाहावं लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world