यशपाल सोनकांबळे, पुणे:
Pune News: पुणे शहरात वाढती वाहतूक कोंडी आणि जड वाहनांमुळे होणारे गंभीर अपघात या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एक कठोर पाऊल उचलले आहे. आगामी १५ जून ते २४ जून या कालावधीत शहराच्या हद्दीत जड आणि अवजड वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत.
पुणे शहरात अवजड वाहनांना नो एन्ट्री
मागील काही काळापासून शहरातील मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांमुळे निर्माण होणारी कोंडी आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, हा निर्णय अनिवार्य ठरला होता. प्राप्त आकडेवारीनुसार, केवळ २०२६ या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जड वाहनांमुळे शहरात ३० मोठे प्राणांतिक अपघात घडले आहेत
या दुर्दैवी घटनांमध्ये ३१ निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा दहा दिवसांचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. प्रामुख्याने सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, मुंबई आणि सातारा या महामार्गांवरून येणाऱ्या जड आणि मल्टी-ॲक्सल वाहनांना या बंदीचा मोठा फटका बसणार आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या दहा दिवसांत शहरांतर्गत वाहतूक सुरळीत करण्यावर भर दिला जाईल. जड वाहनांच्या या बंदीमुळे पुण्यातील वाहतुकीचा वेग वाढण्यास आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि वाहतूक विभागाने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत.