Pune Metro News: पुणेरी मेट्रो (लाईन ३) प्रवाशांसाठी अत्याधुनिक स्मार्ट तिकीट व्यवस्था घेऊन येत असून, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC), WhatsApp QR तिकीट, मोबाईल अॅप, तिकीट व्हेंडिंग मशीन (TVM) आणि तिकीट काउंटर अशा विविध पर्यायांमधून अवघ्या काही क्षणांत प्रवाशांना मेट्रोचे तिकीट घेता येणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक जलद, सुलभ आणि पूर्णपणे डिजिटल होणार आहे.
पुणेरी मेट्रोत स्मार्ट तिकीट व्यवस्थेची एंट्री!
पुणे मेट्रो लाइन ३ च्या प्रवासी वाहतुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुरू होणाऱ्या १२ स्थानकांवर ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (AFC) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकावर दोन प्रवेशद्वार, दोन निर्गमनद्वार आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र असे एकूण पाच AFC गेट्स असतील. गर्दीच्या वेळी प्रवाशांची वर्दळ सुरळीत ठेवण्यासाठी स्मार्ट क्यू व्यवस्थापनाची सुविधाही या प्रणालीत समाविष्ट करण्यात आली आहे. उर्वरित स्थानकांवर देखील ही प्रणाली बसविण्याचे काम सुरू आहे.
केंद्र सरकारच्या 'वन नेशन, वन कार्ड' उपक्रमांतर्गत लाईन तीनवर प्रवासी वाहतुकीच्या पहिल्या दिवसापासूनच NCMC कार्ड वापरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या एकाच कार्डद्वारे पुणे मेट्रोच्या लाईन १, लाईन २ तसेच देशातील इतर शहरांतील मेट्रो सेवांचाही वापर करता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांसाठी स्वतंत्र कार्ड बाळगण्याची गरज राहणार नाही.
प्रवाशांना सध्या मेट्रो लाइन १ आणि लाइन २ साठी सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे मेट्रो या मोबाईल अॅपवरूनही मेट्रो लाइन ३ वरील प्रवासासाठी देखील तिकीट बुक करता येणार आहे. प्रवासी वाहतुकीच्या सुरुवातीला या अॅपमध्ये लाइन ३ च्या तिकीटासाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध असणार आहे. मात्र, लवकरच डिस्ट्रिक्ट कोर्ट स्थानकावर तिन्ही मार्गांचे एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर एकाच अॅपद्वारे संपूर्ण पुणे मेट्रो नेटवर्कसाठी अखंड प्रवासाचे तिकीट मिळणार आहे.
Rain Alert: पुणेकरांनो सावधान! घाटमाथ्यावर रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा; कुठे- कुठे कोसळणार?
डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर म्हणजे WhatsApp QR तिकीट. WhatsApp वरून थेट QR तिकीट काढता येणार असल्याने तिकीट खिडकीवरील रांगा टाळता येतील. याशिवाय प्रत्येक स्थानकावर तिकीट व्हेंडिंग मशीन आणि तिकीट काउंटरची सुविधाही उपलब्ध असेल. विशेष म्हणजे, दिव्यांग प्रवाशांचा विचार करून टीव्हीएम जागतिक योग्यता निकषांनुसार बसविण्यात आले आहेत.
तिकीट खरेदीसाठी रोख रक्कम, UPI, डेबिट कार्ड आणि इतर डिजिटल पेमेंट पर्याय उपलब्ध असतील. तसेच प्रत्येक स्थानकावर QR आणि कार्ड स्कॅनिंग प्रणाली बसविण्यात आल्याने प्रवेश-निर्गमन प्रक्रिया अधिक वेगवान होईल.
प्रवाशांच्या सोयीला केंद्रस्थानी ठेवून ही स्मार्ट तिकीट व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. भविष्यात पुणे मेट्रोचे विस्तारणारे नेटवर्क आणि अखंड कनेक्टिव्हिटी लक्षात घेता ही व्यवस्था शहरातील सार्वजनिक वाहतुकीला अधिक आधुनिक, कार्यक्षम आणि प्रवासी-केंद्रित बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
स्मार्ट तिकीट व्यवस्थेची वैशिष्ट्ये
एकाच NCMC कार्डवर अनेक शहरांतील मेट्रोचा प्रवास
WhatsApp QRवरून थेट तिकीट
मोबाईल अॅपवरून ऑनलाइन बुकिंग
प्रत्येक स्थानकावर TVM आणि तिकीट काउंटर
रोख, UPI, डेबिट कार्डसह विविध पेमेंट पर्याय
दिव्यांगांसाठी सुलभ TVM
स्मार्ट AFC गेट्समुळे जलद प्रवेश-निर्गमन
भविष्यात एकाच अॅपवरून संपूर्ण पुणे मेट्रो नेटवर्कचे तिकीट उपलब्ध
IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या भीतीने जिलबीने बदलला रंग; नेमकं काय घडलंय?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world