रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील आश्रमशाळेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापक आणि वसतिगृह अधीक्षिकेला निलंबित करण्यात आले असून, त्यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य राजकुमार बडोले, धर्मरावबाबा आत्राम आणि नाना पटोले यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते.
( नक्की वाचा:बाहेर ये तुला दाखवतो! शंभूराज देसाई आणि अनिल परब यांच्यात तुफान राडा )
नेमके काय घडले?
राज्यात 'कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)' हे अभियान राबवले जात असून, त्याअंतर्गत नियमित आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण केले जाते. याच सर्वेक्षण दरम्यान वरवणे येथील आश्रमशाळेतील कुमारी खुशबू ठाकरे या विद्यार्थिनीच्या डाव्या डोळ्याखाली एक चट्टा आढळून आला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तिच्यावर कुष्ठरोग विरोधी बहुविध औषधोपचार सुरू करण्यात आले होते. दुर्दैवाने, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, शवविच्छेदन अहवालानुसार टिशू ॲस्ट्रोपॅथोलॉजिकल तपासणी आणि रक्तनमुने केमिकल विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
( नक्की वाचा:मराठी माणसाला घर नाकारल्यास बिल्डरवर कारवाई होणार )
दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या स्तरावर देखील या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. संबंधित मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका यांना अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग यांनी निलंबित केले असून, त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे. तसेच, या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देखील देण्यात आले आहे. आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींसाठी आरोग्यविषयक आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आदिवासी विकास विभागाला सूचना देण्यात येतील, असेही सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सभागृहात सांगितले.