CNG Price: सीएनजी पंपावर रांगेचे विघ्न, कोकणवासी वैतागले; परतीच्या प्रवासातही मनस्ताप

CNG Price: अनेक ठिकाणी वाहनचालक आणि पंप कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडले.

जाहिरात
Read Time: 2 mins
रायगड:

प्रसाद पाटील

मध्यरात्री 12 वाजता CNG चे नवे दर लागू झाले. यामुळे रायगड जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. गणेशोत्सव संपवून मुंबईकडे परतणाऱ्या शेकडो प्रवाशांना या दरवाढीचा जबर फटका बसला. रात्रीच दर वाढल्याने आणि पंप अर्धा तास बंद ठेवल्यामुळे महामार्गावरील विविध सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. हालअपेष्टा सहन करत कोकण गाठलेल्या मंडळींना परतीच्या प्रवासात सहन कराव्या लागत असलेल्या या त्रासामुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे.  

नक्की वाचा: मिया खलिफालाही दर्शनाला बोलवा! 

सीएनजीचे दर वाढले (CNG Price Hike)

रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर सुमारे 15 सीएनजी पंप आहेत. मध्यरात्रीपासून सीएनजीच्या प्रति किलो दरात 50 पैशांनी वाढ झाली. ही दरवाढ लागू करण्यासाठी पंपचालकांनी रात्री 12 वाजता दरांचे सॉफ्टवेअर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू केली. याच काळात जवळपास 30 मिनिटांसाठी सर्व पंप बंद ठेवण्यात आले. कोकणातून गणेशोत्सव संपवून मोठ्याप्रमाणावर कोकणवासी पुन्हा मुंबई-ठाण्याच्या दिशेने निघाले होते. यातील अनेकांच्या गाड्या सीएनजीवर धावणाऱ्या असल्याने त्यांनी रायगडमध्ये आल्यानंतर सीएनजी पंप शोधायला सुरूवात केली. मध्यरात्री झालेली दरवाढ, सॉफ्टवेअर अपडेट करण्याची प्रक्रिया यामुळे सीएनजी पंपावरील रांगा वाढत गेल्या. अचानक पंप बंद झाल्याने आधीच लांबच्या प्रवासाने थकलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

कोकणवासीयांना डबल मनस्ताप

कोकणातून मुंबईच्या दिशेने परतीच्या मार्गावर असलेल्या गाड्यांमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक होते. अचानक झालेल्या या खोळंब्यामुळे त्यांची गैरसोय झाली. अनेक ठिकाणी वाहनचालक आणि पंप कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडले. ‘दरवाढ झाली हे समजू शकतो, पण अचानक मध्यरात्री पंप बंद करून आम्हाला वेठीस धरणे योग्य नाही,' अशी भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली. वाढलेले दर एकीकडे आणि दुसरीकडे तासनतास रांगेत उभे राहून वाया गेलेला वेळ यामुळे मुंबईच्या वाटेवर असलेल्या कोकणवालीयांना दुहेरी त्रास सहन करावा. 

नक्की वाचा: ठाण्याहून नवी मुंबई गाठण्यासाठी अटल सेतू पेक्षा जास्त टोल द्यावा लागणार!

गोंधळामुळे प्रवासी हैराण झाले

गॅससाठी रांगेत लागलेल्या वाहनांच्या रांगा पंपाच्या बाहेर महामार्गापर्यंत पोहोचल्या होत्या, ज्यामुळे अन्य वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. काही संतप्त वाहनधारकांनी पंप प्रशासनाविरोधात निदर्शने करण्याचा इशाराही दिला. दर बदलण्यासाठी वेगळी वेळ निवडण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे, जेणेकरून भविष्यात असा मनस्ताप होणार नाही. सीएनजी दरवाढीने आधीच सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडत असताना, अशा अचानक गोंधळामुळे सामान्य जनता त्रस्त झाली असून, यावर योग्य तो मार्ग काढला जावा अशी मागणी केली जात आहे.  

Advertisement