Rain Alert : मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग बंद! 'या' मार्गाचा करा वापर

Rain Alert Mumbai goa highway closed  : मुंबई-गोवा महामार्ग पावसामुळे बंद झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:


मेहबूब जमादार,प्रतिनिधी

Rain Alert Mumbai goa highway closed  : मुंबईसह संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे रोज धावणारं मुंबई शहर विस्कळीत झालं आहे. उपनगरीय लोकल सेवांवरही यामुळे परिणाम झालाय. तसंच मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्यानं वाहनचालकांचे मोठे हाल होत आहेत. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतूक धीम्या गतीनं सुरु आहे. त्याचवेळी मुंबई - गोवा महामार्ग देखील मुसळधार पावसामुळे बंद पडलाय.

काय आहेत अपडेट?

रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्ग बंद करण्यात आला असून वाहतूक वळविण्यात आली आहे.  मुंबईकडून कोकणाच्या दिशेकडे जाणाऱ्या मार्गावर माणगाव मधील कलमजे गावाजवळ गोद नदीचे पाणी वाढल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे.

त्यामुळे या परिसरात वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. पर्यायी मार्ग म्हणून निजामपूर पाली खोपोली मार्गाचा वापर वाहनचालकांना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक आणखी काही काळ विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. 

( नक्की वाचा : Rain Alert: मुंबईसह राज्यात येत्या 24 तासात पावसाची स्थिती कशी असेल? हवामान विभागाचा अंदाज समोर )
 

कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट

पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांसाठी कोकण किनारपट्टीला 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. येथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण जास्त असून, तिथे 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत या भागात 320 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याउलट, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला असला तरी, अतिमुसळधार पाऊस झालेला नाही. मराठवाड्यासाठी आज 'यलो अलर्ट' आहे.

Advertisement

ऑक्टोबरमध्येही पाऊस पडणार?

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, सध्याची राज्यातील पावसाची स्थिती पाहता, मान्सून वेळेत परत जाईल की नाही याबाबत निश्चित सांगणे कठीण आहे. ते म्हणाले की,  दरवर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने होतो असे नाही, त्यात चढउतार पाहायला मिळतात आणि याला 'व्हेरीएशन' (Variation) म्हटले जाते. पावसाचा जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ असतो, त्यामुळे सप्टेंबरमधील परिस्थिती पाहूनच मान्सून लवकर परतणार की रेंगाळणार हे निश्चित सांगता येईल असे सानप यांनी म्हटले.
 

Topics mentioned in this article