महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली होती. पण विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवली होती. पण आता विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवार आणि मंगळवारी नागपुरात विजेच्या कडकडाटासह अती मुसळधार वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सोमवार 7 जुलै रोजी विदर्भात जवळपास सर्वच जिल्ह्यात ठिकाणी मुसळधार आणि काही ठिकाणी अती मुसळधार पावसाची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोमवार 7 जुलै रोजी गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, भंडारा आणि वर्धा या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशीम आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ते पावसाच्या प्रतिक्षेत होते.
हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार सोमवारी गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर नागपूर, अमरावती, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यांत काही ठिकाणी अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय, यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मंगळवार दिनांक 8 जुलै रोजी नागपूरसह अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह अती मुसळधार वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, विदर्भात अन्यत्र येलो अलर्ट असेल. वर्धा, भंडारा, गोंदिया या तीन जिल्ह्यांत मुसळधार तर अन्य जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.