राहुल कुलकर्णी
सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला भोर तालुका. निसर्गाचा वरदहस्त लाभलेला प्रदेश. इथलं रमणीय वातावरण, उंच डोंगररांगा आणि ऐतिहासिक स्थळांनी नटलेला हा परिसर प्रत्येकाला भुरळ घालतो. याच तालुक्यातील रायरेश्वर पठार, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली, तेच रायरेश्वर पठार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या पठाराचा ताबा खाजगी व्यक्तीकडे असल्याने तिथल्या विकास कामात अडचणी येत आहेत. त्याचा ताबा सरकारने घ्यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. त्यासाठी मोठं आंदोनल उभं केलं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रायरेश्वर मंदिराचा ऐतिहासिक वारसा
11 किलोमीटर लांब आणि दीड किलोमीटर रुंद असलेलं हे पठार शिवकालीन इतिहासाची साक्ष देतं. इथलं रायरेश्वर मंदिर म्हणजे स्वराज्य निर्मितीचा पवित्र मार्ग ठरलेलं ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या पवित्र मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. पण दुर्दैवाने हे ऐतिहासिक ठिकाण खाजगी मालकीच्या वादाचा विषय बनलं आहे. 1991 साली भोरचे राजे पंतसचिव यांच्या वंशपरंपरागत जमिनीतील काही भाग माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या नावावर बक्षीसपत्राद्वारे गेला. यात मंदिर आणि त्याचा परिसरही समाविष्ट आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की, महसूल खात्याच्या नोंदींमध्ये फेरफार करण्यात आली. ज्यामुळे हा ऐतिहासिक वारसा खाजगी मालकीत गेला.
ट्रेंडिंग बातमी - Akola Crime news: शेळीचं पिल्लू आणायला म्हणून गेली अन् चिमुकली बरोबर भयंकर घडलं
ग्रामस्थांची मागणी काय?
गावकरी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. त्यांची मागणी आहे की, रायरेश्वर मंदिर आणि परिसर राज्य सरकारच्या ताब्यात द्यावा. जेणेकरून या ठिकाणाचा योग्य विकास होईल. ग्रामस्थांच्या मते, मंदिर खाजगी मालकीत असल्यामुळे राज्य सरकार किंवा जिल्हा परिषद निधी खर्च करू शकत नाही. यामुळे या ठिकाणाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. सध्या या विषयावर आंदोलन उभं राहिलं आहे. गावकरी, स्थानिक राजकारणी आणि सामाजिक संघटना या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. भाजप कार्यकर्ते समीर घोडेकर, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी, आणि इतर नेत्यांनी या विषयावर आपली बाजू मांडली आहे.
ट्रेंडिंग बातमी - Viral video: हॉर्न वाजवण्यावरून महानाट्य, रागाच्याभरात गाडीच्या टपावर चढला अन्...
या ठिकाणी विकासाचा अभाव
आज रायरेश्वर मंदिराकडे पुरातत्त्व विभागाकडून डागडुजीचं काम सुरू असलं, तरीही पर्यटन सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. रस्त्यांची दुरवस्था, पायाभूत सुविधांचा अभाव आणि मंदिराच्या दुर्लक्षित अवस्थेमुळे पर्यटक आणि भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रामस्थांच्या मते, हे मंदिर राज्य सरकारच्या ताब्यात गेल्यास त्याचा योग्य विकास होईल. रस्ते सुधारणा, पर्यटकांसाठी सोयीसुविधा आणि ऐतिहासिक वारशाचं जतन यामुळे रायरेश्वर मंदिर एक प्रेरणास्थळ म्हणून अधिक प्रसिद्ध होईल. रायरेश्वर पठार हे फक्त एक ऐतिहासिक स्थळ नाही, तर ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. स्वराज्य निर्मितीचं हे प्रेरणास्थान राज्य सरकारच्या ताब्यात येऊन योग्य संवर्धन झाल्यास, ते भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world