जाहिरात

Nashik Politics: तीन दिवसांपूर्वी दरोडाप्रकरणी गुन्हा; फरार आरोपी आज भाजपमध्ये प्रवेश करणार

Nashik Political News : काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गट महानगरप्रमुखपदी नियुक्ती झालेले मामा राजवाडेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Nashik Politics: तीन दिवसांपूर्वी दरोडाप्रकरणी गुन्हा; फरार आरोपी आज भाजपमध्ये प्रवेश करणार

Nashik News: नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटातील सर्वच बड्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. काही माजी नगरसेवक, ज्येष्ठ पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. प्रशांत दिवे, सीमा ताजणे, सचिन मराठे या तीन माजी नगरसेवकांचा आज भाजप प्रवेश होणार आहे. 

याशिवाय काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गट महानगरप्रमुखपदी नियुक्ती झालेले मामा राजवाडेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तीनच दिवसांपूर्वी मामा राजवाडे यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.  ठाकरेंच्या सेनेचे उपनेते सुनील बागुल यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता, ते देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

(नक्की वाचा- Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले)

कोण-कोण भाजपमध्ये प्रवेश करणार?

  • सुनिल बागुल ( शिवसेना उपनेते, उबाठा )
  • मामा राजवाड़े ( महानगर प्रमुख, उबाठा )
  • गणेश गीते ( मा. स्थायी समिति सभापती, शरद पवार गट)
  • सचिन मराठे (उपजिल्हाप्रमुख, मा. नगरसेवक, उबाठा )
  • प्रशांत दिवे ( मा. नागरसेवक, उबाठा )
  • सिमा ताजने ( मा. नगरसेविका,उबाठा )
  • कमलेश बोडके ( मा. नगरसेवक )
  • बाळासाहेब पाठक ( जिल्हा संघटक, उबाठा  )
  • गुलाब भोये ( उपजिल्हा प्रमुख, उबाठा )
  • कन्नु ताजने ( उपजिल्हा प्रमुख, उबाठा )
  • शंभु बागुल ( युवसेना विस्तारक, उबाठा )
  • अजय बागुल ( श्रमिक सेना जिल्हा प्रमुख )

संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत ट्वीट करत म्हटलं की, "भारतीय जमवाजमव पार्टीची कमाल आहे. नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलीस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले. क्लायमॅक्स असा की, हे सगळे फरार (भाजपा साठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत. जमवा जमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे. सत्ता पैसा दहशत, दुसरे काही नाही!"

गणेश गिते स्वगृही परतणार

सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ नाशिकमधील आणखी एक भाजप प्रवेश चर्चेत ठरणार आहे आणि तो म्हणजे शरद पवार गटाचे नेते माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांचा. पंचवटी परिसरातील काही माजी नगरसेवकांसह गिते आज भाजपमध्ये प्रवेश करत स्वगृही परतणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट न दिल्याने गीते यांनी भाजपला सोडचिट्ठी देत शरद पवार गटात प्रवेश करत नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार राहुल ढिकले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. 

(नक्की वाचा-  Ahilyanagar News : महिलांना आमिष देऊन ढाबा, बारमध्ये नाचवायचा; भाजप पदाधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार)

विधानसभा निवडणुकीत पैसे वाटपाच्या आरोपावरून ढिकले आणि गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेले अनेक वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचल्याने नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चर्चेत ठरली होती. दरम्यान गणेश गीते यांना पुन्हा भाजपमध्ये घेऊ नये असं वक्तव्य राहुल ढिकले यांनी काही दिवसांपूर्वी करत त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला होता आणि आज गणेश गीते यांचा कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता मुंबईत हा प्रवेश होतोय. गिरीश महाजन यांचे निकटवर्ती म्हणून गणेश गीते ओळखले जातात.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com