Raj Thackeray- Uddhav Thackeray Alliance: राज्याच्या राजकारणात महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. आगामी पालिका निवडणुकीत ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. मात्र मविआमध्ये राज ठाकरेंच्या नावाला काँग्रेसचा विरोध असल्याचेही सांगण्यात येत आहे. याचबाबत आता सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली असून मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधु एकत्र लढणार असल्याचे सूचक संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.
एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याबाबतच्या चर्चा सुरु असतानाच महाविकास आघाडीमध्ये मात्र बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. पालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधुंची युती झाल्यास, काँग्रेस शिवसेनेसोबत युतीधर्म तोडणार असल्याची चर्चा आहे. याबाबतच आता एका संजय राऊत महत्त्वाचा खुलासा केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
"मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई वाचवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येण्याची भूमिका घेतली असेल सर्व त्याचे स्वागत करतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती हा इंडिया आघाडीचा विषय नाही. याबाबत राष्ट्रीय स्तरावर चर्चा होत नाही. हा प्रमुख बंधुंचा निर्णय आहे तो राज आणि उद्धव ठाकरेंनी घेतला आहे आणि ते समर्थ आहेत, असं सांगितलं आहे, दोन बंधु एकत्र येण्यावर कोणालाही आक्षेप नाही. काँग्रेसलाही असण्याचे कारण नाही," असं संजय राऊत म्हणालेत.
"आम्ही सगळ्यांशी चर्चा करत आहोत. मविआ ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभेसाठी निर्माण झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अशी कोणतीही आघाडी झालेली नाही. प्रत्येक महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये स्थानिक आघाड्या होतात. यामध्ये राज्यातीलही पक्ष अनेकदा नसतात. त्यामुळे या निवडणुकांबाबत निर्णय स्थानिक नेते, शहरातील पदाधिकारी घेतील," असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आगामी पालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरे बंधु एकत्र लढतील आणि काँग्रेसचा मात्र पत्ता कट होईल, अशीही चर्चा आहे. याबाबत आता अधिकृत घोषणा कधी होईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. महाविकास आघाडी ही लोकसभा, विधानसभेला आहे. स्थानिक निवडणुकीबाबत स्थानिक नेते निर्णय घेतील, असं त्यांनी म्हटलं आहे.