
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची आणि राजकीय युतीची जोरदार चर्चा सुरु आहे. मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्रित सभा, त्यानंतर मातोश्रीवरील बंधुभेटीमुळे दोन्ही ठाकरे लवकरच राजकीय युती करतील, पालिका निवडणूक एकत्रित लढतील, अशी चर्चा आहे. मात्र अद्याप या युतीची कोणतीही घोषणा झाली नाही. परंतु मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने बेस्ट कामगार पतपेढी निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्ट निवडणुकीत ठाकरेंची युती
बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची कामगार पतपेढी निवडणूक एकत्रित युती झाली आहे. या बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. बेस्टच्या पतपेढी निवडणूकीसाठी 8 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे त्यासाठी आज (शनिवार, ९) दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या 21 जागापैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा उत्कर्ष पॅनल म्हणून एकत्रित लढणार आहे.
Political News : राहुल गांधींनी ठाकरेंना जागा दाखवल्याचा आरोप; राज-उद्धव जवळीकीमुळे आघाडीत बिघाडी?
ठाकरेंची आघाडी, मविआत बिघाडी
एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याबाबतच्या चर्चा सुरु असतानाच महाविकास आघाडीमध्ये मात्र बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. पालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधुंची युती झाल्यास, काँग्रेस शिवसेनेसोबत युतीधर्म तोडणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने पालिका निवडणुकीसाठी एकला चलो'चा नारा दिला असून राज ठाकरेंना सोबत घेण्यास नकार दिल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world