मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आज ठाकरे बंधुंचे नाव केंद्रस्थानी आले आहे, याचे कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेले विधान. महाराष्ट्र हितापुढे आमचे वाद किरकोळ आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करण्याबाबत सर्वात मोठे विधान केले. या विधानानंतर उद्धव ठाकरेंनीही तात्काळ प्रतिसाद दिल्याने पुन्हा एकदा राज- उद्धव यांच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत आता ठाकरे बंधूंचे मामा चंदू वैद्य यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
'मी बाळासाहेबांना दिलेले वचन आणि माझी इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. दोन्हींकडून सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे. कधी एकत्र यायचं हे काळ ठरवत असतो. आज दोघांच्याही भूमिकेत सकारात्मकता आली आहे. यातच समाधान मानायचे असे चंदू वैद्य म्हणाले. प्रत्येक गोष्टीला माग असतो, प्रत्येक गोष्ट किती ताणायची हे ठरवायचे असते..' असे म्हणत चंदू वैद्य यांनी सध्या सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पुन्हा एकत्र सुरु येण्याच्या चर्चा सुरु असतानाच मामा चंदू वैद्य यांनी एक खास किस्साही सांगितला. मी जेव्हा जेव्हा दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासाठी प्रयत्न करायचो तेव्हा त्याला बाळासाहेबांचा पाठिंबा होता. तु प्रयत्न करतोयस तर कर असं ते म्हणायचे. तसेच दोघेही जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत मी दोघांच्याही घरी जेवणार नाही असे ठरवले होते, यावर बाळासाहेबांनी असं काही ठरवू नको, उपाशी राहशील.. असा मजेशीर सल्ला दिल्याचेही त्यांनी सांगितले.
(नक्की वाचा- "मी राज ठाकरेंना भेटेन आणि विनंती करेन", हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बावनकुळे काय म्हणाले?)
दरम्यान, दोघांची मने, विचार एकत्र यायला हवीत. महाराष्ट्रासाठी असलेला दृष्टीकोन दोघांना एकत्रित आणेल. हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये सुवर्णकाळ येईल. मराठी माणसाला आणखी हिंमत येईल, खट्टू झालेली मने पुन्हा उल्हासित होतील... अशी भावनाही चंदू वैद्य यांनी व्यक्त केली आहे.
(नक्की वाचा- नाशिकमधील हिंसाचार सुनियोजित, दंगेखोरांवर कडक कारवाई करणार : CM देवेंद्र फडणवीस)