मालवणातील राजकोट (Malvan Rajkot Fort) किल्ल्यामध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) 26 तारखेला कोसळला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला असा दावा करण्यात येत होता. हा पुतळा ज्याने तयार केला त्या जयदीप आपटे (Jaideep Apte) याने आठ महिन्यांपूर्वीच पुतळ्यासोबत काहीतरी बरंवाईट होऊ शकतं अशी भीती वर्तवली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं.
20 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याने नौदलाला पत्र लिहून पुतळ्याचे बोल्ट गंजल्याचे कळवले होते. यामुळे पुतळा विद्रुप झाल्याचे नौदलाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. हा पुतळा उभारणीपासूनच अनेक महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, आणि नियमांनाही बगल देण्यात येत होती असा आरोप करण्यात येत होता. या आरोपांची पडताळणी करण्यासाठी आम्ही राज्य कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांच्याशी बातचीत केली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आपटे याने हा पुतळा उभारत असताना 6 फुटी क्ले मॉडेलसाठीची परवानगी घेतली होती, त्यानंतर त्याने पूर्णाकृती पुतळा उभारताना आणि उभारल्यानंतर एकदाही संपर्क साधला नाही.
हे ही वाचा : महाविकास आघाडीचा सरकारविरोधात एल्गार
2017 साली शासनाने एक शासन निर्णय जाहीर केला होता ज्याद्वारे राष्ट्र पुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी परवानगी देण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली होती. पुतळा उभारण्या-या सांस्थेने पुतळयाच्या क्ले मॉडेलला कला सांचालनालयाची मान्यता घेऊन ब्राँझ वा अन्य धातू, फायबर वा इतर सावहत्यापासून पुतळा तयार करावा आवण मान्यता घेतलेल्या मॉडेल प्रमाणेच पुतळा उभारण्याची दक्षता घ्यावी. असे या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हणण्यात आले आहे. राज्य कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी मालवणमध्ये घडलेल्या घटनेबाबत बोलताना म्हटले की, "क्ले मॉडेलला परवानगी घ्यावी लागते. सहा फुटी पुतळ्याला परवानगी घेण्यात आली होती. सहा फुटी क्ले मॉडेलचा त्यांनी 35 फुटी पुतळा उभारला. त्यासाठीची परवानगी घेण्यात आली नव्हती.जीआरनुसार कोणताही पुतळ्याच्या सर्व बाबी तपासून आम्ही पुतळ्याला मान्यता देतो. मुख्य वास्तूशास्त्रज्ञाकडून एक परवानगी लागते. पुतळा घडवण्यापूर्वी आणि घडवत असतानाही आम्हाला येऊन शिल्पकाराने दाखवणे गरजेचे असते जे त्याने केले नाही."
हे ही वाचा : 'त्या' दिवशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा डावा हात निखळला होता
राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धातूंच्या पट्ट्या जोडून करण्यात आला होता. त्याऐवजी हा पुतळा ब्राँझचा करण्यात आला असता तर बरे झाले असते असे मिश्रा यांनी म्हटले आहे. वाऱ्याच्या वेगाने धातूच्या पट्ट्या जागेवर राहिल्या नाहीत आणि त्यातून हा प्रकार घडल्याचे ते म्हणाले. यावरून असे दिसते की वाऱ्याच्या वेगाचा अंदाज न बांधता स्ट्रक्चरल इंजिनिअरनी काम केल्याचे दिसून येत आहे, असे मिश्रा यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, एखाद्या पुतळ्याचे काम जेजे स्कूल ऑफ आर्टसमध्ये येते तेव्हा 3-4 तज्ज्ञ मंडळींची एक समिती नेमण्यात येते. ही समिती क्ले मॉडेलपासून पुतळा संपूर्ण तयार होईपर्यंत वेळोवेळी आढावा घेते आणि शिल्पकाराला काही अडचण आली तर त्यासाठी त्याला मार्गही सुचवते. मात्र जयदीप आपटे, क्ले मॉडेलला परवनागी मिळाल्यानंतर परत कधीही परत आला नाही असे मिश्रा यांनी सांगितले. अशा पुतळ्याच्या निर्मितीसाठी किमान 1 वर्षांचा कालावधी लागतो, मात्र हा पुतळा शिल्पकाराने अवघ्या 7 महिन्यात बनवला होता. पुतळ्याच्या लोकार्पणापासून अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे.