रामराजे शिंदे, प्रतिनिधी
Rajya Sabha Elections 2026: राष्ट्रवादी काँग्रेसमधील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर आता सर्वांच्या नजरा एका महत्त्वाच्या रिक्त जागेकडे लागल्या आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षातल्या एका नव्या पर्वाचा श्रीगणेशा झाला. पक्षाची सगळी सूत्रं आता सुनेत्रा पवार यांच्या हाती आली असून, त्यांच्यासोबतच पार्थ पवार यांचे पक्षातले वजन कमालीचे वाढले आहे. विशेष म्हणजे, आता पक्षात जुन्या जाणत्या नेत्यांपेक्षा पार्थ पवार यांच्या निकटवर्तीयांना सुगीचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यसभेसाठी पार्थ पवारांच्या शिलेदारांची नावं चर्चेत
सुनेत्रा पवार यांनी रिक्त केलेल्या राज्यसभेच्या जागेसाठी 18 जून रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. या जागेवर कोणाची वर्णी लागणार, यावरून सध्या पक्षात जोरदार खलबतं सुरू आहेत. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या मायलेकरांची जोडी आता पक्षाचे सर्व महत्त्वाचे निर्णय घेत आहे.
या नव्या रचनेत पार्थ पवार यांच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. यामध्ये अविनाश आदिक यांचे नाव सर्वात वर आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अविनाश आदिक यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. राष्ट्रीय स्तरावर पक्ष बळकट करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असून दिल्लीतील त्यांच्या संपर्कामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता दाट आहे.
( नक्की वाचा : NEET Paper Leak : पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजच्या प्राचार्याला बेड्या! 'नीट' च्या परीक्षेत असा झाला पेपरचा सौदा )
विदर्भातून सुबोध मोहितेंची तगडी दावेदारी
राज्यसभेच्या शर्यतीत दुसरे महत्त्वाचे नाव आहे ते म्हणजे सुबोध मोहिते यांचे. मोहिते यांना लोकसभेचा आणि केंद्रीय मंत्रिपदाचा मोठा अनुभव आहे. ते पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. विदर्भातील राजकारणात सुबोध मोहिते यांना बळ देऊन प्रफुल्ल पटेल यांचे पक्षातील महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पार्थ पवारांच्या कोअर टीममधील नेत्यांना अशा प्रकारे मुख्य प्रवाहात आणून पक्षनेतृत्व आपली नवी फळी उभी करत असल्याचे दिसत आहे.
अनुभव की निष्ठा? नेत्यांमध्ये चढाओढ
उमेदवारीसाठी केवळ पार्थ पवारांचे निकटवर्तीयच नव्हे, तर छगन भुजबळ, प्रमोद हिंदुराव आणि संजय काकडे यांचीही नावे चर्चेत आहेत. छगन भुजबळ यांच्याकडे मोठा राजकीय अनुभव आणि राष्ट्रीय प्रश्नांची जाण आहे. मात्र, भुजबळांसारखा ज्येष्ठ नेता राज्यात मंत्रिमंडळात सोबत असावा, अशी सुनेत्रा पवारांची भूमिका असल्याने त्यांना दिल्लीला पाठवण्याची शक्यता कमी वर्तवण्यात येत आहे.
( नक्की वाचा : Pune News: ज्याच्यावर विश्वास टाकला, त्यानेच माऊलींचा खजिना लुटला; आळंदी हादरली! )
दुसरीकडे, अजित पवारांचे विश्वासू प्रमोद हिंदुराव यांचे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशीही घरगुती संबंध आहेत. त्यामुळे 'घरचा माणूस' म्हणून त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. तसेच पुण्याचे व्यावसायिक संजय काकडे यांचे नावही या रेसमध्ये कायम आहे.
जुन्या नेत्यांची नाराजी आणि नवी फळी
सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळल्यापासून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचे महत्त्व काहीसे कमी झाल्याची चर्चा पक्षात रंगली आहे. हे ज्येष्ठ नेते सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे बोलले जाते. मात्र, या नाराजीची पर्वा न करता सुनेत्रा पवारांनी नवीन आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे पक्षात आता 'जुने जाणते' विरुद्ध 'पार्थ पवारांचे तरुण शिलेदार' असे दोन गट पडल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. 18 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी कोणाला संधी मिळते, यावरून आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसची दिशा नक्की काय असेल, याचे स्पष्ट संकेत मिळणार आहेत.