सोलापूरची ओळख असलेला माळढोक पक्षी नान्नज अभयारण्यात पुन्हा आढळून आला आहे. अत्यंत दुर्मीळ असलेला माळढोक पक्षी यंदाच्या वर्षी दिसून आल्याने पर्यावरणप्रेमीकडून आनंद व्यक्त केला जात आहे. दरवर्षी बुद्धपौर्णिमेला राज्यातील अनेक अभयारण्यात वन्य प्राण्यांची गणना केली जाते. नान्नज अभयारण्यातूनही वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली होती. यंदाच्या वर्षीच्या गणनेत माळढोक सोबतच कुदळ्या पक्षी दिसला असून नीलगायींच्या संख्येतही वाढ झाली आहे.
मादी माळढोक पक्षीसह 21 कुदळ्या पक्षी दिसून आले. मागील वर्षीच्या गणनेत 4 नीलगायी आढळून आल्या होत्या. त्यात आता वाढ झाली असून त्यांची संख्या 6 झाली आहे. यासह खोकड, रानमांजर, रानडुक्कर, कोल्हा, मोर, निलगाय आणि काळवीट यांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळले. या गणनेत एकूण 14 प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळले. त्यांची एकूण संख्या ही 757 इतकी दिसून आली.
नक्की वाचा - ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, 1 जूनपासून लागू होणार नवा नियम
गणनेत आढळलेले पक्षी आणि प्राणी
- माळढोक - 1
- कुदळ्या - 21
- लांडगा - 8
- खोकड - 13
- मुंगुस - 5
- रानमांजर - 6
- ससा - 18
- रानडुक्कर - 249
- सायाळ - 1
- कोल्हा - 4
- घोरपड - 2
- मोर - 61
- नीलगाय - 6
- काळवीट - 362
महाराष्ट्रात माळढोक पक्षांची संख्या चिंतेचा विषय
एकेकाही महाराष्ट्रातील मराठवाडा, नगर, सोलापूर, बीड, चंद्रपूर, यवतमाळ या भागात माळढोक पक्ष्यांची संख्या आढळत असतं. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ही संख्या रोडावली आहे. महाराष्ट्रासह हा पक्षी आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये आढळतो. माळढोकची संख्या कमी होत असल्याने विविध राज्यांमधून त्यांच्या सुरक्षिततेसाठी सेंटर उभारण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात शिकार झाल्याने हा पक्षी नामषेक होऊ नये यासाठी माळढोक पक्ष्यासाठी कायद्याकडून संरक्षण देण्यात येत आहे.