Ratnagiri Airport : गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी विमानतळ सुरू झाली आहे. काही दिवसात नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळही सुरू होणार आहे. दरम्यान कोकणवासियांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच रत्नागिरीतील विमानतळ प्रवाशांसाठी खुला होणार आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात माहिती दिली. या विमानतळामुळे तासाभरात कोकणात जाता येणार आहे.
मुंबई ते रत्नागिरी ३२६ किलोमीटर असून रस्तेमार्गाने यासाठी ७ ते ८ तास लागतात. त्यातही मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे प्रवासाचा वेळ अधिक वाढतो. मात्र रत्नागिरीत विमानतळ सुरू झाल्यानंतर प्रवाशांना एका तासाच्या आत रत्नागिरीत पोहोचता येणार आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या सहा ते सात महिन्यात माल आणि प्रवासी वाहतुकीसाठी रत्नागिरीतील विमानतळ सज्ज असणार आहे. म्हणजे एप्रिल 2026 पर्यंत रत्नागिरी विमानतळ प्रवाशांच्या सेवेत सज्ज असेल. रत्नागिरी फ्लाइंग क्लबची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे सामंत यांनी दिली.
नक्की वाचा - Mumbai Local shuttle : कल्याण-कर्जत शटल दर 4 मिनिटांनी, जीवनवाहिनी कात टाकणार; रेल्वेचा आतापर्यंतचा मोठा प्लान
तिकीटदर किती असेल?
रत्नागिरीला विमानातून जाताना किती तिकीट असेल याबाबत कोकणवासियांमध्ये चर्चा आहे. उदय सामंत यांनी याबाबतही मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, शेतकरी दोन हजार रुपयात विमानात बसून कोकणात पोहोचू शकणार आहे. 2 हजार रुपयात तुम्हाला रत्नागिरीला पोहोचता येणार आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवात कोकणवासियांनी खड्डेमय रस्त्यावरुन प्रवास करावा लागणार नाही. तर अवघ्या काही तासात त्यांना कोकण गाठता येणार आहे.