पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रत्नागिरीतील आरेवारे समुद्रावर पोहण्यासाठी गेलेले रत्नागिरीतील 4 जण बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये 4 जण ठार झाले असून त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्यात 3 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जुनेद बशीर काझी, ( 30, ओसवाल नगर, रत्नागिरी), जैनब जुनेद काझी, ( 28, ओसवाल नगर, रत्नागिरी), उजमा समसुद्दीन शेख (वय 17, मुळ मुंबई मुंब्रा, सध्या ओसवाल नगर, रत्नागिरी), ऊमेरा समसुद्दीन शेख (वय 16, मुळ मुंबई मुंब्रा, सध्या ओसवाल नगर, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या 4 जणांची नावे आहेत.
पर्यटक बुडाल्याची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना मिळताच रत्नागिरी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढण्यात आले. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रत्नागिरी शहरातील ओसवालनगर येथील कुटुंब आरे वारे येथील समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळच्या वेळी फिरण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्र स्नानाचा आनंद घेत असताना 3 महिला समुद्राच्या पाण्यात ओढल्या गेल्या.
या महिलांनी आरडा ओरडा करताच त्यांच्यातील एका पुरुषाने त्यांना वाचण्यासाठी धाव घेतली. मात्र त्यांना वाचवताना तोही बुडाला. पोलिस घटनास्थळी दाखल होताच स्थानिक आणि काही तरुणांनी 4 जणांना बाहेर काढले. यातील 4 जण मृत झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू असताना, सुरुवातीला बुडालेल्या चार जणांपैकी तिघांचे मृतदेह हाती लागले. नंतर एकाचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.