राकेश गुडेकर, रत्नागिरी: चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग ठप्प झाला आहे. पिंपळी – खडपोली, तिवरे, नांदिवसे रस्त्यावरील पिंपळी नदीवरील पूल कोसळल्याने दसपटीकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.. दरम्यान वाहतूक बंद करत असतानाच पूल कोसळला त्यामुळे दुसऱ्या बाजूने येणारी रिक्षा बालंबाल बचावली..
१९६५ साली बांधलेला हा पूल जुना झाल्यामुळे कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पुलाच्या काही भागांना तडे गेल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, उपअभियंता अरुण मुळजकर, ज्युनिअर इंजिनिअर महेश वाजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
Ahilyanagar : पाथर्डीच्या 'या' गावात नाही हनुमान मंदिर, मारुती कारही नाही; काय आहे रहस्य!
पुलाची पाहणी केल्यानंतर कोणताही मोठा अपघात टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान याचवेळी पूल कोसळला. पण यात दुसऱ्या बाजूने येणारी रिक्षा बालंबाल बचावली. दसपटी विभागाकडे जाणारे प्रवासी आणि वाहनचालक यांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पिंपळी – पेढाबे फाटा – खडपोली या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
दुसरीकडे, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांची लक्झरी बस रविवारी मध्यरात्री भीषण आगीत सापडल्याची घटना घडली. ही दुर्घटना मुंबई–गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या सुरुवातीस रात्री दोनच्या सुमारास घडली. लक्झरी बस कोकणाच्या दिशेने प्रवास करत असताना अचानक टायरचा मोठा आवाज होत फुटला आणि काही क्षणांतच आगीच्या ज्वाळा पसरल्या.