Mumabi-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक 10 तासांपासून ठप्प, LPG टँकर उलटल्याने वाहनांच्या रांगा

मुंबईच्या दिशेने आणि गोव्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहने अडकून पडली आहे. छोट्या वाहनांची वाहतूक बावनदी ते पाली अशी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर, रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. एलपीजी गॅस वाहून नेणारा एक टँकर पुलावरून खाली कोसळला. या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हातखंबा गावातील वाणी पेठ येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक गेल्या 10 तासांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही गेल्या दोन महिन्यांतील दुसरी अशी घटना आहे. महामार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईच्या दिशेने आणि गोव्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहने अडकून पडली आहे. छोट्या वाहनांची वाहतूक बावनदी ते पाली अशी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. अजून चार ते पाच तास मुंबई गोवा मार्ग सुरळीत होण्यासाठी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

अपघातानंतर तात्काळ एमआयडीसीच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि गॅसची गळती तात्पुरती थांबवण्यात यश मिळवले. सध्या पलटी झालेल्या टँकरला सरळ करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. टँकर सरळ झाल्यानंतर त्यातील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षितपणे ट्रान्सफर केला जाणार आहे.

वाहनांसाठी पर्यायी मार्ग

छोट्या वाहनांसाठी प्रशासनाने बाबनदी-पाली मार्गे वाहतूक वळवली आहे. मात्र, अवजड वाहनांसाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने त्यांना महामार्गावरच थांबून राहावे लागले आहे.

Advertisement

(नक्की वाचा : Dombivli: डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ, रस्त्यावरील घाण पाण्यात धुवून सुरु आहे केळ्यांची विक्री )

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी पाहणी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले की, "जोपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत नाही आणि टँकर बाजूला करून रस्ता सुरक्षित होत नाही, तोपर्यंत वाहतूक पूर्ववत होणार नाही. प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Topics mentioned in this article