राकेश गुडेकर, रत्नागिरी: कोकणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. चिपळूणमधून गत विधानसभा निवडणूक लढवलेले, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 19 तारखेला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा हा प्रवेश सोहळा पार पडेल.
चिपळूणमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते, मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शिवसेना (शिंदे गट) सुद्धा यादव यांना आपल्याकडे घेण्यास इच्छुक होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यासाठी प्रयत्न केले होते, पण अखेर यादव यांनी भाजपची वाट निवडली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
प्रशांत यादव यांच्या प्रवेशाने भाजपला फायदा...
याबाबत नितेश राणे यांनी सांगितलं की, "प्रशांत यादव यांनी भाजपमध्ये यावं असा आमचा आग्रह होता. त्यांच्या प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पक्षाची संघटना अधिक मजबूत होईल आणि शत प्रतिशत भाजप या घोषणेच्या दिशेने आम्ही पुढे जाऊ." यादव यांच्याकडे सहकाराचं मोठं जाळं आहे, ज्यामुळे चिपळूण-संगमेश्वरमध्ये भाजपची ताकद वाढेल. 2029 च्या निवडणुकीत इथे भाजपचा आमदार निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे प्रशांत यादव यांना ताकद देण्यासाठी इथे आलो आहे.. आम्ही ताकद त्यांच्या मागे उभी करू.. कार्यकर्ता म्हणून ही माझी भावना असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, प्रशांत यादव यांनी गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिपळूणमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी अजित पवार गटाचे शेखर निकम यांना कडवी झुंज दिली होती. यादव यांना सुमारे 90 हजार मते मिळाली होती, पण 6,867 मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला. यादव यांच्यामुळे चिपळूण-संगमेश्वरमध्ये भाजपाला चांगलीच बळकटी मिळणार आहे.
यंदा गणेशोत्सवात झळकणार 'ऑपरेशन सिंदूर'चे प्रतिबिंब; CM फडणवीसांचे मंडळांना आवाहन