- राकेश गुडेकर, रत्नागिरी
अंगी जिद्द असेल तर कोणत्याही गोष्टीवर मात करून यश मिळवणे शक्य असते. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे वेदिका तुकाराम गोरे. आठ बाय आठच्या छोट्या खोलीमध्ये वेदिका आपल्या कुटुंबासहित राहते. रत्नागिरीतल्या रा.भा. शिर्के प्रशालेत ती शिकत होती. कुटुंबात आई-वडील आणि वेदिका असे तिघेच... घरची परिस्थिती अतिशय बेताची. आई वडील रहिवासी इमारतीमध्ये कचरा उचलण्याचे, साफसफाईचे, देखरेखीचे काम करतात आणि तेथीलच छोट्या खोलीमध्ये राहतात. अशा परिस्थितीत अभ्यास करत वेदिकाने दहावीच्या परीक्षेत गगनभरारी घेतली आहे. तिनं 95.80 टक्के गुण मिळवले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वेदिकाने असा केला अभ्यास
वेदिका मिळवलेल्या यशाबद्दल म्हणते की,"आई-वडील, शिक्षक, मित्र-मैत्रिणींनी खूप सपोर्ट केला. जे प्रश्न जमत नव्हते, ते ग्रुपमध्ये बसून सोडवले. जो अभ्यास कळत नव्हता, त्या समस्या शिक्षकांकडून समजून घेतल्या. तसेच वर्षभरात ज्या-ज्या वेळेस परीक्षा झाल्या, त्यामध्ये नेमक्या काय चुका झाल्या आहेत, याबाबत शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. वर्षभर नुसता अभ्यास एके अभ्यासच नाही केला, अभ्यासासोबत मौजमस्ती देखील केली. पण परीक्षेपूर्वी अभ्यास पूर्ण झाला होता. आई वडिलांनी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही, हे नाही मिळणार ते नाही मिळणार असं कधीही त्यांनी म्हटले नाही.
(नक्की वाचा: शेतकऱ्याची भन्नाट आयडिया! कोंबड्यांसाठी थेट लावला एसी)
परिस्थिती हलाखीची असताना देखील आई-वडिलांनी मला काही कमी पडू दिलं नाही, त्यांचे कष्ट मी वाया जाऊ देणार नाही; हे सांगतानाच वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाऊल टाकायचे असल्याचंही वेदिकाने म्हटले.
(नक्की वाचा: पायल कपाडियाने कान्समध्ये रचला इतिहास, यापूर्वीही देशासाठी केलीय अशी महत्त्वपूर्ण कामगिरी)
आईच्या डोळ्यात आनंदाश्रू
"वेदिकाला अभ्यास कर असे कधी सांगावे लागले नाही, आमच्या अपेक्षेपेक्षा तिने खूप चांगले गुण मिळवले आहेत", हे सांगताना आई उज्ज्वला गोरे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
उज्ज्वला गोरे पुढे असेही म्हणाल्या की, " वेदिका आमची एकुलती एक मुलगी. अभ्यासाबाबत आम्हाला तिला कधीही-काहीही सांगावं लागले नाही. तिने खूप अभ्यास केला आणि तेही स्वतःच्या मनाने केला. आम्हाला तिचा खूप अभिमान आहे. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न आहे. पण आमची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे शक्य होईल तेवढे आम्ही कष्ट तिच्यासाठी नक्कीच घेऊ".
वेदिकावर होतोय कौतुकाचा वर्षाव
वेदिकाच्या शिक्षकांनाही तिच्या पालकांइतकाच आनंद झाला आहे. शिक्षकांनी घरी जाऊन तिचे कौतुक केले. वेदिकाच्या यशाचे कौतुक करत शिक्षक राहुल कांबळे म्हणाले की, "वेदिकाने जे यश संपादन केले आहे, ती बाब अतिशय अभिमानस्पद आहे. ती माझी विद्यार्थिनी असल्याने तिच्या यशाबद्दल मला खूपच आनंद झाला आहे. आपण ज्या परिस्थितीत राहतो, त्याचे भान आणि जाणीव तिला आहे. मुळातच कष्ट करण्याची तिची वृत्ती आहे, तिची मेहनत आणि पालकांच्या पाठिंब्याने तिने हे यश संपादन केले आहे. अभ्यासू विद्यार्थ्याची वृत्ती, आग्रही हे गुण तिच्यामध्ये आहेत. त्यामुळे ती उज्ज्वल यश संपादन करेल याची आम्हाला खात्री होती.
रहिवाशांनीही तिच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. सोसायटीतील रहिवासी मनोहर सावंत म्हणाले की, आमच्या शांतीदर्शन सोसायटीमध्ये गोरे कुटुंबीय साफसफाईचं आणि देखरेखीचं काम करतात. त्यांची मुलगी वेदिका हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दहावीच्या परीक्षेत चांगलं यश संपादन केलं आहे. त्यामुळे तिचं कौतुक करावं तेवढं थोडकेच आहे. तिच्या यशाची बातमी समजल्यापासून आम्हाला खूपच अत्यानंद झालेला आहे.
कष्ट करण्याची जिद्द असेल तर यश कोणत्याही परिस्थितीत मिळते. एका छोट्याश्या खोलीत राहत परिस्थितीशी झुंज देत तिथेच अभ्यास करत वेदिकाने मिळवलेलं यश निश्चितच उल्लेखनीय आहे.
Women BSF Warriors | 45 डिग्री तापमान, भारत-पाक सीमेवर BSF च्या महिला सैनिकांचा पहारा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world