मुंबईकरांनो सावध राहा! हवामान खात्याने जारी केला ऑरेंज अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन

भारतीय हवामान खात्याने 09 जुलैसाठी देखील मुंबईसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

सगळेजण गाढ झोपेत असताना हजेरी लावलेल्या पावसाने कोकण किनारपट्टीवर अक्षरश:धुमाकूळ घातला. मुंबई आणि आसपासच्या परिसरात रविवारी पाऊस अधून मधून कोसळत होता. मध्यरात्रीनंतर त्याने आपला उग्र चेहरा दाखवण्यास सुरुवात केली. सोमवारी सकाळी उठल्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड परिसरातील लोकांना पावसाचा हा उग्र चेहरा दिसला. उद्याही हा उग्र चेहरा पाहावा लागण्याची दाट शक्यता आहे कारण भारतीय हवामान खात्याने 09 जुलैसाठी देखील मुंबईसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.मुंबईकर नागरिकांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी मुंबई महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती महापालिकेतर्फे करण्यात आली आहे.

Advertisement

मुंबईमध्ये सोमवारी 9 तासात 101.08 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. उपनगरात 14.8 मिलीमीटर पावसाची तर मुंबई शहरात 101.08 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. उपनगराच्या तुलनेत मुंबई शहरात तब्बल सातपट अधिक पाऊस झाला आहे. मुंबईप्रमाणे महाराष्ट्राच्या बहुतांश भागाला पावसाने आज झोडपून काढले. मुंबई शहरातील हवामानाची नोंद ठेवण्याचे काम कुलाबा वेधशाळेद्वारे केले जाते. इथे सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत 101.08 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या तुलनेत सांताक्रूझ हवामान केंद्रावर याच काळात 14.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वसाधारणपणे मुंबई शहरात, उपनगराच्या तुलनेत पाऊस कमी नोंदवला जातो. मात्र सोमवारी याच्या उलट चित्र पाहायला मिळाले.

Advertisement

मुंबईपेक्षा अधिक पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटले की, रायगडमध्ये 117.9 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. नायर यांनी म्हटले की मुंबईतील परिस्थिती पाहून मंगळवारी सकाळी 8.30पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. नंतर याची तीव्रता कमी करून मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भासाठी मंगळवारी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article