मनोज सातवी, प्रतिनिधी
Bhiklya Ladkya Dhinda Padma Awards 2026 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील चार दिग्गजांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातून कोणा-कोणाला मिळाले पद्म पुरस्कार?
भिकल्या लडक्या धिंडा (महाराष्ट्र)
रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)
आर्मिदा फर्नांडीस (महाराष्ट्र)
श्रीरंग देवबा लाड (महाराष्ट्र)
यामध्ये पालघरच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा या अती दुर्गम भागात राहणाऱ्या भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आदिवासी समाजातील तारपा या पारंपरिक वाद्य आणि नृत्याला सातासमुद्रापार पोहोचविणाऱ्या भिकल्या धिंडा यांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. गेल्या 80 पेक्षाही जास्त वर्षांपासून भिकल्या धिंडा हे तारपा वाद्य वाजवत आहेत.
१२ वर्षांपासून तारपा वाद्याची आवड...
धिंडा यांनी शाळेत जाऊन कधी शिक्षण घेतलं नाही. मात्र आपली संस्कृती जपण्यासाठी त्यांनी प्रवाहाविरोधात जात तारपाला जवळ केलं. धिंड्या यांना अवघ्या बारा वर्षांपासूनच तारपा नृत्याची आणि वाद्याची आवड निर्माण झाली होती. आज 92 वर्षाचे झाल्यानंतर देखील त्यांच्यात तारपा वाद्याची आवड तशीच आहे. मात्र आताच्या तरुणपिढीने तारपाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. याबाबत ते खंत व्यक्त करतात. सर्व ऑनलाइन चालेल तर संस्कृती कशी टिकेल, असा सवाल ते यावेळी उपस्थित करतात आणि तरुणांनी आपली लोकपरंपरा जपण्यासाठी तारपा शिकावं असं आवाहन करतात.
धिंड्या यांना आतापर्यंत शेकडो पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. मात्र देशातील सर्वोच्च असलेल्या पद्मश्री या पुरस्कारामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळतोय. तारपा हेच वाद्य आपलं दैवत असून येणाऱ्या पिढ्यांनी ही परंपरा जपली पाहिजे असा आवाहन देखील यावेळी धिंडा यांच्याकडून करण्यात आलं .