Beed News : एकीकडे बीड जिल्ह्याचं नाव राज्यभरात गुन्हेगारी वृत्तांसाठी चर्चेत असताना दुसरीकडे मात्र बीडमधील एका पिग्मी एजंटच्या मुलीचा राज्यात डंका पाहायला मिळतोय. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि जेएमएफसी यांनी घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश परीक्षेत घवघवीत यश संपादन करत राज्यात पहिला येण्याचा मान बीडमधील एका तरुणीला मिळाला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या शिरपेच्यात पुन्हा एकदा मानाचा तुराच रोवला गेला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि जेएमएफसी यांनी घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णी ही राज्यात पहिली आली आहे. विशेष म्हणजे 114 पैकी पहिल्या 10 गुणवंतांमध्ये 9 मुलींचा समावेश असून बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णी हिने पहिल्याच प्रयत्नात मोठं यश मिळवत राज्यात पहिली येण्याचा बहुमान पटकावला आहे. ऋचा कुलकर्णीचे वडील पिग्मी एजंट म्हणून गेली 35 वर्षापासून बीड शहरातील पूर्णवादी बँकेत काम करतात. 100 रुपयाला 2 % कमिशन त्यांना मिळतं त्यातूनच आपली उपजीविका भागवतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावर ऋचा कुलकर्णी म्हणाल्या, की आज मला आकाश ठेगणं झालं आहे. माझ्या यशामध्ये माझे आई-वडील, माझे भाऊ आणि गुरुजन यांचा सर्वांचा वाटा आहे. या परीक्षेचा अभ्यास मी पुण्यामध्ये केला. एलएलबी झाल्यानंतर मला सरकारी नोकरी करायची होती आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. माझे वडील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करतात. आई बालवाडीमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. शिक्षणासाठी मला जे पैसे लागायचे, त्याच्यासाठी अडचणी यायच्या. मात्र बारावीनंतर मला एक शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यातूनच माझे एलएलबीचं शिक्षण पूर्ण झालं. पुण्यासारख्या शहरात राहणं सोपं नाही, त्या ठिकाणी दहा ते पंधरा हजार रुपये महिना खर्च येतो. त्यातून मला आई आणि वडील पैसे पाठवायचे. अत्यंत काटकसरीने पैशाचा वापर करीत होते. वडील कशा पद्धतीने हे सर्व करत होते, हे मी पाहिलं होतं आणि विशेष म्हणजे पिग्मी एजंटला काय त्रास होतो, हे मला माहीत आहे. 100 रुपयासाठी कितीतरी वेळ थांबावं लागतं. मी माझ्या आई-वडिलांचा फोटो माझ्यासोबत कायम ठेवायचे, त्यामुळे माझे आई-वडील काय करत आहेत ? हे मला त्याच्यातून दिसायचं आणि त्याच्यातूनच मी अभ्यास करायचे.
नक्की वाचा - Who is Nidhi Tiwari: कोण आहेत PM मोदींच्या खासगी सचिव निधी तिवारी? काय दिली जबाबदारी? 'एवढा' पगार मिळणार
तर याविषयी ऋचा कुलकर्णीचे वडील म्हणाले, की बीड शहरातील लोकांनी मला फार सहकार्य केलं. माझ्यावर त्यांचे फार उपकार आहेत. मुलगी न्यायाधीश झाली तर वडिलांचा कंठ दाटून आला. मी 35 वर्षापासून पिग्मी एजंट म्हणून काम करतोय. एक-एक, दोन-दोन रुपये गोळा करतोय. मी कुणालाही धोका दिला नाही. मी आतापर्यंत केलेल्या कष्टाचा चीज झालं. माझ्या मुलीनं माझ्या कष्टाचं चीज केलं. असं सांगताना वडिलांचा कंठ दाटून येत होता. ऋचा कुलकर्णीच्या आईला, आपली मुलगी न्यायाधीश झाली हे सांगताना अश्रू अनावर झाले. आम्ही अनेक ठिकाणी नोकरी केली... विविधं काम केली. मात्र चांगलीच कामं केली, कुणालाही धोका दिला नाही. त्यामुळे आमच्या कामाचं चीज झाल्याच्या पाहायला मिळतं आणि जे काम माझ्या मुलीने केले ते सर्व मुलींनी करावं, चांगलं राहावं असं देखील ऋचाच्या आईने म्हटलं आहे.
ऋचा कुलकर्णीची आजी म्हणते, माझ्या मुलाने केलेल्या कष्टाचं चीज झालं. आम्ही दारिद्र्यांचं आयुष्य जगलोय, मात्र त्या कष्टाचं चीज झालं. आता समाधान वाटतंय, माझ्या मुलांने आणि नातीने केलेला कष्टाचं चीज झालं. दरम्यान एकीकडे बीड जिल्ह्याचे नाव कायदा आणि सुव्यवस्था बिघडली म्हणून घेतली जात असताना, दुसरीकडे मात्र याच कायद्याच्या चौकटीत बसून जे काम करतात, त्या न्यायाधीशाच्या परीक्षेत बीड जिल्ह्यातील पिग्मी एजंटच्या मुलीने राज्यभरात मोठं नाव कमावलं. तिने पहिला येण्याचा बहुमान मिळवत, बीड जिल्ह्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील या नवनिर्वाचित न्यायाधीशाची राज्यात आता चांगली चर्चा होत आहे.