सुनिल दवंगे, प्रतिनिधी
Shirdi Saibaba Temple News : श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांवर देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांची अढळ श्रद्धा आहे.या असीम भक्तीभावनेतून साईभक्तांकडून साईबाबांच्या चरणी वेळोवेळी विविध स्वरूपात दान अर्पण केले जाते.याच भक्तिभावातून गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एका साईभक्त कुटुंबाने शिर्डी साईबाबा संस्थानला तब्बल 12 लाख 39 हजार 440 रुपये किमतीची सोन्याची श्री गणेश मूर्ती दान स्वरूपात अर्पण केली आहे. पण या दानशूर व्यक्तीनं त्याचं आणि कुटुंबीयांचं नाव जाहीर केलेलं नाहीय.
सोन्याच्या गणेश मूर्तीची किंमत किती?
अहमदाबाद येथील या साईभक्त परिवाराने 102.450 ग्रॅम वजनाची सोन्याची श्रीगणेश मूर्ती आज शिर्डी साईबाबा संस्थानकडे विधीपूर्वक सुपूर्द केली. बाजारभावानुसार या मूर्तीची किंमत 12 लाख 39 हजार 440 रुपये इतकी आहे. दान अर्पण करण्यापूर्वी या सुवर्ण श्रीगणेश मूर्तीला साईबाबांच्या समाधीसमोर काही वेळासाठी ठेवण्यात आलं.काही काळ ठेवून भाविकांनी श्रद्धेने दर्शन घेतले.
नक्की वाचा >> Pune Metro News : मेट्रोच्या माध्यमातून कोंढवा परिसर 'या' भागाशी जोडला जाणार, CM फडणवीसांची मोठी घोषणा
त्यानंतर ही मूर्ती साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराव दराडे यांच्याकडे विधीपूर्वक सुपूर्द करण्यात आली. हे साईभक्त कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहेत. काही महिन्यांपूर्वी याच परिवाराने साईबाबांच्या चरणी सुवर्णहार देखील अर्पण केला होता,जो सध्या संस्थानकडून वापरण्यात येत आहे.
नक्की वाचा >> सारा अर्जुन का बनली 'धुरंधर'ची हिरोईन? 1300 मुलींमध्ये कशी झाली निवड? डायरेक्टर म्हणाले, "पार्ट 2 मध्ये.."
उत्सव काळात पूजेसाठी वापर
यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने देणगीदार साईभक्तांचा शाल आणि साईबाबांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. अर्पण करण्यात आलेली ही सुवर्ण श्रीगणेश मूर्ती साईबाबा मंदिरात उत्सव व सणाच्या काळात होणाऱ्या पूजाविधीमध्ये वापरण्यात येणार असल्याची माहिती उपकार्यकारी अधिकारी भीमराव दराडे यांनी दिली.साईचरणी अर्पण झालेली ही देणगी साईभक्तांच्या निःस्वार्थ भक्तीभावनेचं आणि साईबाबांवरील अढळ श्रद्धेचं सुंदर प्रतीक मानली जात आहे.