साजन ढाबे, प्रतिनिधी
मुंबई ते नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज 29 डिसेंबरच्या रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार वाशिम जिल्ह्याच्या वनोजा गावाजवळ घडला. या महामार्गावरुन जाणाऱ्या तब्बल 50-60 गाड्या पंक्चर झाल्या होत्या. सुरुवातीला यामागील कारण कुणाच्याही लक्षात येत नव्हतं. कार चालकांनाही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. नेमकं रात्रीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने समृद्धी महामार्गावर पंक्चर झालेल्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाशिम जिल्ह्यातील वनोजा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रात्री 11 वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. नागपूरकडे जाणाऱ्या लेनवर पत्र्याचा तुकडा पडल्यामुळे 50 ते 60 वाहनांचे टायर एकाच वेळी पंक्चर झाले. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आणि प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावरील उभारण्यात आलेल्या फ्लेक्सच्या पत्र्याचा तुकडा महामार्गावर पडला होता. वेगाने जाणाऱ्या वाहनांना हा पत्रा दिसला नाही आणि वाहनांचे टायर या पत्र्यावरून जाताच पंक्चर होत होते. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवासी महामार्गावरच अडकून पडले होते. समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वात आधुनिक महामार्गांपैकी एक मानला जातो. पण या घटनेदरम्यान महामार्ग प्रशासनाने तातडीने मदत केली नाही, ही बाब गंभीर ठरली. पंक्चर झालेल्या वाहनांसाठी महामार्गावर कोणतीही त्वरित सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना काही वेळ महामार्गावर थांबावे लागले. काही प्रवारी टायर बदलून निघून गेले.
नक्की वाचा - Khandoba Yatra : सोमवती यात्रेनिमित्त कुलदैवताच्या दर्शनाला निघाले पण रस्त्यातच...; दोघांचा मृत्यू तर 14 जखमी
या घटनेमुळे प्रवाशांनी महामार्ग प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीही समृद्धी महामार्गावर अशा घटना घडल्या आहेत, जिथे खिळे टाकून वाहनांचे टायर पंक्चर करण्यात आले आहे. अशा घटना लुटीच्या उद्देशाने घडत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रवाशांनी महामार्गावरील सुरक्षेत सुधारणा करण्याची मागणी केली आहे. ज्यामध्ये रात्रीच्या वेळी गस्त पथकांची नेमणूक करणे, महामार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, तत्काळ मदत केंद्रांची स्थापना करणे आणि अत्यावश्यक परिस्थितीत दुरुस्ती सेवा उपलब्ध करणे. या घटनेनंतर प्रशासनाने तपास सुरू आहे. महामार्गावर पडलेल्या पत्र्याचा तुकडा अपघाताने पडला की हेतुपुरस्सर टाकण्यात आला याचा शोध घेतला जात आहे. याशिवाय, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना राबवण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. समृद्धी महामार्ग हा जलदगतीने प्रवासासाठी ओळखला जातो. पण अशा घटनांमुळे प्रवाशांचा विश्वास कमी होत आहे. परिणामी महामार्गावरून रात्री प्रवास करणे धोकादायक ठरत असल्याचं स्पष्ट झाले आहे. महामार्ग प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना न केल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनू शकतो, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून दिली जात आहे.