Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावरील धक्कादायक प्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीएत. या महामार्गावर चक्क देशी दारू विकली जात असल्याचा प्रकार समोर आला होता आणि त्यावर तातडीने कारवाई करत ते दुकान बंद करण्यात आलं. हा प्रकार ताजा असतानाच आता याच समृद्धी महामार्गावरील आणखी काही भीषण आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे या हाय-स्पीड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अब्जावधी रुपये खर्च करून तयार झालेल्या या महामार्गावर सध्या नेमकं काय चाललंय, यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आधी दारूविक्री आणि आता खड्ड्यांचं साम्राज्य
समृद्धी महामार्गावरील खड्डे पाहून हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा हाय-स्पीड मार्ग आहे की मुंबई-गोवा महामार्ग, असा संभ्रम प्रवाशांना पडू लागला आहे. ज्या महामार्गावरून सुसाट वेगाने जाण्यासाठी वाहनधारकांना किमान 1500 रुपयांचा टोल मोजावा लागतो, त्याच महामार्गाची अवस्था आता एखाद्या गावाठाणातल्या खराब रस्त्यापेक्षाही वाईट झाल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. निकृष्ट रस्तेबांधणीमुळे अनेक ठिकाणी या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

एकाच पुलावर 16 खड्डे आणि...
या खड्ड्यांच्या भीषणतेचं उदाहरणच द्यायचं झालं तर, शिर्डी एक्झिट पॉईंटजवळ मुख्य समृद्धी महामार्गाच्या एकाच पुलावर चक्क 16 पेक्षा जास्त मोठे खड्डे पडले आहेत. या महामार्गावर वाहनांसाठी 120 चा स्पीड निश्चित करण्यात आला आहे. मात्र, या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्याने वेगात येणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्यांचा अजिबात अंदाज येत नाही. अचानक समोर येणाऱ्या या खड्ड्यांमुळे वाहनांचे नियंत्रण सुटून इथे मोठे अपघात घडत आहेत.
हाय-स्पीड हायवेवर शेळ्या-मेंढ्यांची चराई
या महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचे धिंडवडे काढणारा आणखी एक प्रकार म्हणजे, या हाय-स्पीड महामार्गाला खेटून चक्क मेंढपाळ आपल्या मेंढ्या चरण्यासाठी आणत आहेत. अनेकदा ही जनावरं किंवा मेंढपाळांसोबत असलेले पाळीव श्वान थेट मुख्य रस्त्यावर येतात. 120 च्या स्पीडने जाणाऱ्या वाहनांसमोर अचानक एखादं जनावर आल्यास चालकाला वाहन नियंत्रित करणं अत्यंत अवघड होऊन बसतं. या सर्व प्रकारामुळे कोट्यवधी रुपयांची सुरक्षा यंत्रणा आणि गस्त घालणारी पथकं नेमकी कुठे झोपा काढतायत, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

टोल भरूनही प्रवाशांचा मृत्यूच्या छायेत प्रवास
तब्बल 55000 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला हा 'समृद्धी महामार्ग' आता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. हजारो रुपयांचा टोल भरूनही प्रवाशांना मृत्यूच्या छायेतून प्रवास का करावा लागतोय, असा सवाल आता सामान्य वाहनधारक विचारत आहेत. या सर्व प्रकाराचे व्हिडिओ आणि वृत्त समोर आल्यानंतर आता राजकीय वर्तुळातूनही तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षांनी या दुरवस्थेवरून प्रशासनावर टीका केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world