अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी
Chandrapur News : समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात चंद्रपूर शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पत्नी नव्या नोकरीत रुजू होणार होती. यासाठी सर्व कुटुंब चंद्रपूरहून अकोल्याकडे जात असताना धामणगाव रेल्वे तालुक्यातील चॅनल क्रमांक १०६ जवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, संपूर्ण कुटुंबाचा कारमध्येच मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू...
मिळालेल्या माहितीनुसार, आरती जीवने यांची अकोला येथील समाज कल्याण विभागात नोकरी लागली होती. तिच्या जॉइनिंगसाठी जीवने सह परिवार अकोल्याला जायला निघाले होते. जीवने कुटुंबीय वॅगनार कारने प्रवास करीत होते. त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर जोरदार धडकली. या भीषण धडकेत चारचाकी वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. मृतांमध्ये भास्कर जीवने, महादेव जीवने, लता जीवने, आरती जीवने आणि १२ वर्षीय त्रिशा जीवने यांचा समावेश आहे.
भरधाव वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे चंद्रपूरच्या बाबुपेठ परिसरासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world