Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (HTMS) अंतर्गत 'गँट्री' उभारण्याचे काम हाती घेण्यात आल्याने 9 ते 13 जानेवारी दरम्यान अमरावती जिल्ह्यातील टप्प्यात वाहतूक काही काळ थांबवण्यात येणार आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून अमरावती जिल्ह्याच्या हद्दीतून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आजपासून 13 जानेवारीपर्यंत वाहतूक कोंडी किंवा प्रवासात व्यत्ययाचा सामना करावा लागू शकतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत लोखंडी सांगाडे (गँट्री) बसवण्याचे काम सुरू केले आहे. या हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममुळे भविष्यात समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यास आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यास मोठी मदत होणार आहे.
कुठे आणि कधी असेल वाहतुकीवर परिणाम?
- कालावधी - 9 जानेवारी ते 13 जानेवारी
- ठिकाण - अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या तालुक्यांमधून जाणारा टप्पा.
- टप्पा - 90 + 500 किमी ते 150 + 300 किमी दरम्यान.
कामाचे स्वरूप- महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणालीसाठी (HTMS) आवश्यक असलेले मोठे गँट्री बसवले जाणार आहेत.
45 मिनिटे ते 1 तास ब्लॉक
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे काम एकूण 10 टप्प्यांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. गँट्री उभारताना सुरक्षेच्या कारणास्तव दररोज साधारणपणे 45 मिनिटे ते एक तास वाहतूक पूर्णपणे थांबवली जाईल. काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने चालवली जाऊ शकते. शक्य असल्यास कामाच्या वेळेत या मार्गावरून प्रवास टाळावा किंवा ब्लॉकची वेळ तपासून प्रवासाला निघावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.