शरद सातपुते, प्रतिनिधी
Sangli Mayor Election 2026 Candidates : सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकणार हे आता स्पष्ट झाले आहे. आता सर्वांचं लक्ष महापौर पदाच्या खुर्चीवर कोण बसणार याकडे लागलं आहेत. राज्यात महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत अद्याप झालेली नसली, तरी भाजपने आपली मोर्चेबांधणी पूर्ण केली आहे. विशेषतः जर हे पद सर्वसाधारण वर्गासाठी (ओपन) सुटले, तर भाजपमधील दोन दिग्गज नेत्यांमध्ये या पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. या सत्तासंघर्षात सांगली आणि मिरज अशा दोन्ही शहरांतून प्रबळ दावेदार समोर आल्याने पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.
कोण होणार सांगलीचा महापौर?
महापौर पदाच्या शर्यतीत सध्या धीरज सूर्यवंशी आणि निरंजन आवटी या दोन नावांची सर्वाधिक चर्चा आहे. या दोन्ही नेत्यांकडे महापालिकेतील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. धीरज सूर्यवंशी यांचे घराणे गेल्या सात टर्मपासून महापालिकेत प्रतिनिधित्व करत आहे, त्यामुळे त्यांचे राजकीय वजन मोठे आहे.
दुसरीकडे, मिरजेतील निरंजन आवटी हे देखील सातव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले अत्यंत अनुभवी नेते आहेत. या दोघांपैकी एकाची निवड करताना भाजप नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. सांगलीला झुकते माप मिळणार की मिरजेला मान मिळणार, यावरच आता सत्तेचे पुढील गणित अवलंबून आहे.
( नक्की वाचा : Sangli News : सांगलीत रंगतदार खेळ, दिग्गजांना पराभवाची धूळ, कुणी मारली बाजी? पाहा विजयी नगरसेवकांची यादी एकत्र )
शिवसेनेची साथ आणि सत्तेची समीकरणे
भाजपकडे सध्या 39 नगरसेवक असून बहुमतासाठी केवळ एका जागेची कमतरता होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने प्रथमच या महापालिकेत 2 जागा जिंकून भाजपचा सत्तेचा मार्ग सुकर केला आहे. या दोन जागांच्या पाठिंब्यामुळे महायुतीचे संख्याबळ 41 झाले असून बहुमताचा 40 हा आकडा त्यांनी पार केला आहे.
सध्याच्या समीकरणात भाजपला अजित पवार गटाच्या 16 नगरसेवकांची गरज भासणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापौर भाजपचा आणि उपमहापौरपद शिंदे गटाला देऊन वाटाघाटी पूर्ण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
( नक्की वाचा : KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत 'गेम' सुरु, भाजपा नेत्याचा महापौरपदाबाबत खळबळजनक दावा, शिवसेना काय करणार? )
पक्षीय बलाबल आणि आरक्षणाची प्रतीक्षा
सांगली महापालिकेच्या एकूण 78 जागांचे चित्र पाहता भाजप 39 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. विरोधी पक्षात काँग्रेस 18, अजित पवार यांची राष्ट्रवादी 16 आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी 3 जागांवर आहे. आरक्षणाचे चित्र स्पष्ट होताच भाजप आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सूर्यवंशी आणि आवटी या दोन्ही समर्थकांकडून आपापल्या नेत्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. नव्या चेहऱ्याला संधी मिळते की अनुभवी हातांकडे शहराची धुरा सोपवली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.