शरद सातपुते, सांगली:
Sangli Brothers Death: सांगलीमधून एक काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. सांगलीमधील जत तालुक्यात दोघा सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका भावाला वाचवण्यासाठी दुसरा भाऊ धावला अन् दुर्दैवाने दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सख्ख्या भावांचा मृत्यू,सांगलीत हळहळ
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगलीच्या जत तालुक्यातल्या सनमडी येथे साठवण तलावामध्ये बुडून दोघा शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हर्षद संजय कांबळे (वय 16) व जगदीश वसंत मोरे (वय 15) अशी मृत मुलांची नावे आहेत. दोघेही अत्ये व मामेभाऊ होते. हर्षद याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती, तर जगदीश हा नववी इयत्तेत शिक्षण घेत होता.
मृत हर्षद याच्या वडिलांच्या सनमडीच्या साठवण तलावातील मत्स्य ठेका असल्याने अत्येभाऊ जगदीशसोबत हर्षद साठवण तलावर गेला होता. यावेळी तोल जाऊन जगदीश हा साठवण तलावामध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी हर्षदने पाण्यात उडी घेतली, मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
एसटीच्या धडकेत बाप-लेकाचा मृत्यू
दुसरीकडे, भंडारा शहरातील एसटी डेपोमधून एसटी रिव्हर्स घेत असताना दोन बापलेकांचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव रोहित खेडकर (35 वर्ष) व त्याचा 3 वर्षाचा मुलाचा रौनक हा देखील मृत्यू झाला आहे. रोहित हा RO चालवत होता, नेहमीप्रमाणे त्यांनी रिकाम्या RO कॅन नेण्यासाठी तो एस टी डेपोमध्ये आला. तितक्यात बस चालकाने रिव्हर्स घेतला त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. सद्या घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक जमले असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.