जाहिरात

Pune News: नोटांचे नंबर सांगून भुरळ घालणारा पुण्याचा बाबा पोलिसांच्या जाळ्यात; दिग्गजांची धास्ती वाढली !

Pune News: चमत्कारांच्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Pune News: नोटांचे नंबर सांगून भुरळ घालणारा पुण्याचा बाबा पोलिसांच्या जाळ्यात; दिग्गजांची धास्ती वाढली !
Pune News: या प्रकरणात आणखी अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News: स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणारा आणि चमत्कारांच्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्याच्या मांजरी परिसरातून मनोहर मामाला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. फसवणूक, आर्थिक गैरव्यवहारासारखे अत्यंत गंभीर आरोप या स्वयंघोषित गुरुवर करण्यात आले आहेत.

पोलिसांची धडक कारवाई आणि अटक

मनोहर मामा विरोधात सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस त्याच्या मागावर होते. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पुण्यात छापेमारी केली आणि त्याला अटक केली. सध्या पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोण आहे हा बाबा?

खिशातील नोटांचे अचूक नंबर सांगणारा बाबा अशी मनोहर मामाची ख्याती पसरली होती. या कथित चमत्काराला भुलून हजारो लोक त्याच्या दरबारात हजेरी लावत असत. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन भक्तांकडून मोठी रक्कम उकळणे आणि महिलांचे शोषण करणे असे प्रकार या ठिकाणी सुरू होते. चमत्काराच्या नावाखाली सामान्य जनतेची दिशाभूल करून त्याने मोठी माया जमा केल्याचेही तपासात समोर येत आहे.

( नक्की वाचा : नाशिकची 'ती' बडी कंपनी 'कॉर्पोरेट जिहाद' चा अड्डा ! मशिदीत ट्रेनिंग ते ऑफिसमध्ये बीफ, वाचा हादरवणारी माहिती )

का झाली कारवाई?

 व्यवसाय उद्योगात भरभराट आणायचे असेल तर पूजाअर्चा केली पाहिजे. असे सांगून मनोहर मामा भोसले याने दोन लाख रुपयाची एका भक्ताकडे मागणी केली होती. यामध्ये संबंधित भक्ताने 50 हजार रुपये मनोहर मामा भोसले आणि त्यांच्या साथीदाराकडे दिले. 50 हजार रुपये दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात मनोहर मामा भोसले आणि एकविरोधात आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा, अंधश्रद्धा निर्मूलन गुन्हे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.. याच गुन्ह्यामध्ये कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या पथकाने मनोहर मामा भोसले यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे

राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे कनेक्शन

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मनोहर मामाच्या दरबारात केवळ सामान्य जनताच नाही, तर मोठे राजकीय नेते आणि सनदी अधिकारी देखील नतमस्तक होत होते. राजकीय फायद्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी अनेक जण या बाबाचा सल्ला घेत असल्याची चर्चा आहे. समृद्धी महामार्गाच्या कामातून कोट्यवधी रुपये कमावलेला एक सेवानिवृत्त अधिकारी तर नांदेड लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळावे म्हणून थेट हेलिकॉप्टरने या बाबाच्या दरबारात पोहोचला होता. या माहितीमुळे प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये 4 मे रोजी राडा होणार? मराठी सक्तीच्या मुद्यावर मनसेचा आक्रमक इशारा )
 

मनोहर मामावर झालेल्या या कारवाईनंतर समाजात वावरणाऱ्या अशा स्वयंघोषित बाबांवर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा एकदा व्यक्त केली जात आहे. श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला हा बाजार थांबवण्यासाठी कठोर कायदे आणि जनजागृतीची आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. आता या अटकेनंतर कोणाकोणाचे धागेदोरे समोर येतात आणि या बाबाला कोणी राजाश्रय दिला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com