संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे दिवंगत गणपतराव देशमुख यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत संयम आणि सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवले. मात्र, आता त्यांच्याच घरातून या वारशाला तडा देणारी घटना समोर आली आहे.
गणपतराव देशमुख यांचे नातू आणि सांगोल्याचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांनी एका कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. सांगोला पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायण जगताप यांनी हा आरोप केल्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चर्चा संपूर्ण राज्यभरात रंगली आहे.
काय आहे प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी संध्याकाळी 6 ते 6:30 वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील मांजरी येथे घडली. आमदार बाबासाहेब देशमुख हे स्वतः नारायण जगताप यांच्या घरी पोहोचले होते. तिथे त्यांनी चहापान केले आणि त्यानंतर जगताप यांना उद्देशून एक सूचक वक्तव्य केले.
तुमचा मुलगा सोशल मीडियावर माझ्याबद्दल काहीही लिहीत असतो, त्यामुळे माझे कार्यकर्ते काय करतील हे मला माहीत नाही, मी तर मुंबईला निघालो आहे, असे सांगून आमदार घराबाहेर पडले. त्याच क्षणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जगताप यांच्या घरावर हल्ला चढवला. या हल्ल्यादरम्यान धक्काबुक्की करण्यात आली आणि घरातील महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा दावा जगताप यांनी केला आहे.
( नक्की वाचा : Thane Municipal Election : ठाण्यात शिवसेना-भाजप युती, मनसेच्या 28 उमेदवारांची घोषणा; पाहा तुमच्या प्रभागात कोण? )
दोन नातवांमधील राजकीय संघर्षाची किनार
या वादाच्या मुळाशी गणपतराव देशमुख यांच्या दोन नातवांमधील राजकीय स्पर्धा असल्याचे समोर येत आहे. आमदार बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख या दोन भावांमध्ये राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू आहे.
ज्या जगताप कुटुंबावर हा हल्ला झाला, त्यातील नारायण जगताप हे बाबासाहेब देशमुखांचे समर्थक आहेत, मात्र त्यांचा मुलगा बाळकृष्ण जगताप हा अनिकेत देशमुख यांचा कट्टर समर्थक आहे. बाळकृष्ण हा वारंवार अनिकेत देशमुख यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकत असतो. या पोस्टचा राग मनात धरूनच हा हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
देशमुख यांच्या वारशाला गालबोट
गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर ज्या विचारसरणीने सांगोल्याचे राजकारण केले, त्या राजकारणाला या निमित्ताने गालबोट लागल्याची भावना जनमानसात उमटत आहे. गणपतरावांचे राजकारण हे नेहमीच संस्कार आणि नीतिमत्तेवर आधारित होते, मात्र त्यांच्याच वारसदाराने अशा प्रकारे हिंसेचे समर्थन केल्याचा आरोप होत असल्याने सांगोल्याच्या राजकीय वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे.
नारायण जगताप यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती उघड केली असून, ते आता सांगोला पोलीस ठाण्यात आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world