विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पटलावर सध्या अत्यंत खालच्या भाषेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली. यावरुन महाविकास आघाडीसह महायुतीतील नेतेही खवळले. महायुतीतील अनेक नेत्यांनी खोतांनी पवारांविषयी केलेल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला. यानंतर सदाभाऊ खोतांना उपरती झाली आणि त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
मात्र यादरम्यान राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक केला. सदाभाऊ खोतांनी शरद पवारांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय राऊतांनी त्यांना कुत्रे म्हणून संबोधिले. यानंतर सदाभाऊ खोत कुठे शांत राहणार होते. त्यांनीही राऊतांना डुक्कर म्हटलं. अशा प्रकारे एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्या राजकारणाचा चिखल झाला.
नक्की वाचा - Satara-Jawli Constituency : बलाढ्य शिवेंद्रराजेंसमोर नवख्या अमित कदमांची कसोटी
संजय राऊत काय म्हणाले...
शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते जे राजकारणाचे भीष्मपितामह आहेत. कधी कधी पीएम मोदीही ज्यांना आपले गुरू मानतात. मोदी सरकारने ज्यांना पद्मविभूषण हा सर्वोच्च किताब दिलाय. ते शरद पवार महाराष्ट्राचे नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र देवेंद्र फडणवीसांचे दोन कुत्रे नेहमी घाणेरड्या पद्धतीने भुंकतात. मग ते शरद पवारांसारखे नेते असो की इतर कोणी. त्यामुळे महाराष्ट्राला लाज वाटते. शरद पवार आजारी आहेत. तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात छाती ताणून उभे आहेत. सदाभाऊ खोतांची भाषा पाहिली? ते शरद पवारांच्या चेहऱ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेबद्दल वक्तव्य करतात.
सदाभाऊ खोतांचं संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर
संजय राऊताला गावगाडा माहीत नाही. कुत्रा हा इमानदार असतो. इमाने इतबारे धन्याची राखण करतो. तसं आम्ही आमच्या धन्याची राखण करत आहोत. मात्र तुम्ही 2014 ला मोदींचा फोटो गळ्यात अडकवून मतांचा जोगवा मागत गावोगावी हिंडत होता. 2019 लाही भाषणं करीत होता. सत्तेवर आल्यावर पहिला खंजीर हातात घेतला. कुत्र्याएवढाही तुमच्यात इमानदारपणा असता तर महाराष्ट्रानं तुमचं कौतुक केलं असतं. मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही, कारण डुकराला कितीही साबण-शॅम्पू लावला तरी डुक्कर गटारातच जात असतं.