सुजित आंबेकर, प्रतिनिधी
राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आजपासून निवडणूक प्रचाराला वेग वाढला आहे. राजघराण्यातील छत्रपतींचे वंशज ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात त्याविषयी आज आपण पाहणार आहोत. सातारा-जावळी मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ज्या पक्षात असतील, त्या पक्षाच्या पाठीशी येथील मतदारांचा कौल राहिला आहे, असं गेल्या काही निवडणुकांमधून दिसून येतं. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गेली 20 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सध्या ते भाजपसोबत असून, त्यांच्याविरोधात माजी आमदार जी जी कदम यांचे सुपुत्र अमित कदम यांचे तगडे आव्हान आहे.
जावळीतील दुर्गम भागात विणलेले रस्त्यांचे जाळे, विविध पर्यटन प्रकल्पांसाठी आणलेला निधी, पहिल्या व दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची मजबूत टीम, मोठा जनसंपर्क त्याचबरोबर प्रतापगड कारखान्याच्या माध्यमातून आमदार शिवेंद्रराजेंनी आपली ताकद वाढविल्याने सध्यातरी त्यांचे पारडे जड आहे.
सातारा-जावळी मतदारसंघ हा स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव शिवेंद्रसिंहराजेंना या मतदारसंघातील जनतेने साथ दिली. त्यामुळे 2004, 2009, 2014, 2019 असे सलग चार पंचवार्षिक ते या मतदारसंघातून आमदार झाले. पहिल्यांदा ते राष्ट्रवादीत होते. 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व आमदार झाले. पण या मतदारसंघात पक्षापेक्षा नेत्याला महत्त्व आहे. येथील जनता शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठीशी कायम राहते. यावेळेसही ते पाचव्यांदा भाजपकडून रिंगणात आहेत.
नक्की वाचा - काँग्रेसच्या 'त्या' नेत्यावर कारवाई का नाही? भास्कर जाधवांना सार्वजनिकपणे व्यक्त केली खंत
2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला रामराम करत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या चिन्हावर त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांच्यासमोर भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या दीपक पवार यांचं आव्हान होतं. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दीपक पवार यांचा पराभव करत विजय मिळवला होता.
शिवेंद्रराजे भोसले पुन्हा एकदा भाजपच्या चिन्हावर सातारा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. आता त्यांच्यासमोर अमित कदम यांचं आव्हान आहे. अमित कदम देखील भाजपमध्ये गेले होते. भाजपची साथ सोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते अजित पवारांसोबत होते. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सदस्यत्व घेतलं होतं. जागा वाटपात ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यानं त्यांना शिवबंधन बांधाव लागलं.
साताऱ्यातील राजघराण्यातील सत्तासंघर्ष अनेक वर्ष सातारकरांनी पाहिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी यापुढं राजकीय संघर्ष होणार नाही, असा शब्द त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला होता. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे एकत्र आल्याचा देखील विधानसभा निवडणुकीत फायदा होणार आहे.
नक्की वाचा - पालघरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहूया..
सातारा मतदारसंघात सातारा व जावळी तालुक्यांच्या समावेश होतो. 2009 पूर्वी जावळी हा स्वतंत्र मतदारसंघ होता. या जावळीतून 1995 मध्ये शिवसेनेचे सदाशिव सपकाळ विजयी झाले होते. त्यापूर्वी शिवसेनेचा उमेदवार जावळीतच नव्हे तर जिल्ह्यात कोणत्याच मतदारसंघात विजयी झाला नव्हता. सदाशिव सपकाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले आमदार ठरले होते. त्यापूर्वी जावळी मतदारसंघातून 1957 मध्ये कृष्णराव हरिभाऊ तरडे शेकापकडून तर 1972 मध्ये लालसिंगराव शिंदे अपक्ष म्हणून विजयी झाले होते. हे दोन अपवाद वगळता 1952 बाबासाहेब जगदेवराव शिंदे, 1962, 1967, 1978 असा तीन निवडणुकांत भिकू दाजी भिलारे गुरुजी, 1980, 1985 मध्ये धोंडीराम भिकोबा (डी. बी.) कदम हे सर्व काँग्रेसकडून विजयी झाले होते. 1990 मध्ये काँग्रेसचे जी. जी. कदम विजयी झाले.
1995 मधील शिवसेनेचा विजय काँग्रेसला जिव्हारी लागला होता. पण पुढील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती. आणि शरद पवार यांनी माथाडी कामगारांचे आक्रमक नेते शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली. 1999 व 2004 मध्ये शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले. 2009 च्या निवडणुकीवेळी मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि जावळी मतदारसंघाचा समावेश सातारा मतदारसंघात झाला. शशिकांत शिंदे यांना कोरेगावची उमेदवारी मिळाली.
सातारा मतदारसंघात 2009 पूर्वी एखादा अपवाद वगळता काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. 1952 मध्ये पूर्व सातारा व पश्चिम सातारा असे दोन मतदारसंघ होते. त्यात पूर्व सातारा मतदारसंघातून विठ्ठलराव नानासाहेब (व्ही. एन.) पाटील कामगार किसान पक्षाकडून तर पश्चिम सातारामधून बाबूराव बाळासाहेब घोरपडे काँग्रेसकडून विजयी झाले होते. 1957 मध्ये विठ्ठलराव नानासाहेब पाटील (अपक्ष), 1962, 1967, 1972 या तीन निवडणुकांत काँग्रेसच धोंडीराम शिदोजी जगताप विजयी झाले. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत 1978 मध्ये प्रथमच जनता पक्षाकडून राजघराण्यातील अभयसिंहराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी बाबुराव घोरपडे यांना पराभूत करत विजय मिळवला. नंतर अभयसिंहराजे भोसले काँग्रेसमध्ये गेले. 1980, 1985, 1990, 1995 असे चार वेळा ते काँग्रेसकडून विजयी झाले. त्यावेळी अभयसिंहराजे भोसले यांनी मंत्रिमंडळात विविध खाती सांभाळली.
राज्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात अभयसिंहराजे भोसले मातब्बर नेते म्हणून कार्यरत होते. मात्र, 1996 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसले यांचा पराभव झाला. शिवसेनेचे हिंदूराव नाईक निंबाळकर विजयी झाले होते. शिवसेनेचा हा लोकसभेतील पहिला विजय होता. यशवंतराव चव्हाण यांच्या मतदारसंघातील पराभवाने काँग्रेसची नाचक्की झाली होती. नंतर 1998 मध्ये झालेल्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत काँग्रेसने अभयसिंहराजे भोसले यांना उमेदवारी दिली आणि अभयसिंहराजे भोसले खासदार झाले. त्यावेळी सातारा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत अभयसिंहराजे यांचे चिरंजीव शिवेंद्रसिंहराजे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. तर अभयसिंहराजे यांचे पुतणे उदयनराजे यांना भाजपने उमेदवारी दिली. उदयनराजे विजयी झाले आणि भाजपला जिल्ह्यातील पहिला विजय नोंदवला गेला. त्यानंतर मात्र 1999 च्या निवडणुकीत अभयसिंहराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले. त्यांच्या निधनानंतर 2004,2009,2014 या तीन निवडणुकांत शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले. मात्र, 2019 ची निवडणूक शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपकडून जिंकले.
गेले वीस वर्ष आमदार असलेल्या शिवेंद्रराजेंनी राज्यात ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षासोबत राहुन सत्तेचा उपयोग करुन गावागावांत विकास कामांचा धडाका लावला आहे. अगदी दुर्गम व डोंगराळ भागातील 25-50 वस्ती असलेल्या वाडीपर्यंत काही ना काही काम त्यांनी या काळात केले आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंनी गावोगाव मोठी विकासकामे मार्गी लावली आहेत. दुसऱ्या बाजूने अमित कदम यांच्या मर्यादाही स्पष्ट होत आहेत. त्यात अमित कदम यांच्या सहकाऱ्यांमधील व कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकली जात नाही. कार्यकर्ते खूपच ढिले पडले आहेत. शिवेंद्रराजेंच्या झंझावातापुढे विरोधकांकडे असणारी मरगळ कशी झटकली जाणार आणि गावागावातील संपणाऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांला चैतन्य कसे देणार हा खरा प्रश्न असून नवखे अमित कदम यावर काय तोडगा काढणार याची उत्सुकता मतदारसंघात आहे. शेवटचा मुद्दा सर्वपक्षीय विरोधक आमदार शिवेंद्रराजेंच्या विरोधात एकवटले आहेत. भाजपकडून हा मतदारसंघ खेचून घेऊन महाविकास आघाडी इतिहास बदलणार का हे ही निवडणूक ठरविणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world