सूरज कसबे, पुणे आळंदी
कैवल चक्रवर्ती साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 193वा पालखी प्रस्थान सोहळा 29 जून रोजी अलंकापुरीमध्ये संपन्न होत आहे. या पालखी सोहळ्यासाठी मंगळवारी (18 जून) सकाळी 10 वाजता माऊलींच्या मानाच्या अश्वांचे आणि ध्वजाचे पूजन केल्यानंतर शितोळे सरकार घराण्याचे हे अश्व आळंदीच्या दिशेने रवाना झालेत. गेले कित्येक पिढ्या माऊलींच्या पालखी सोहळ्याला मानाचे अश्व देण्याचा मान बेळगावच्या शितोळे अंकली येथील शितोळे सरकार (Shitole Sarkar) या घराण्याला आहे . माऊलींच्या पालखी पुढे चालणारे दोन्ही अश्व याच शितोळे घराण्याचे आहेत. हिरा आणि मोती अशी या अश्वांची नावे आहेत.
(ट्रेंडिंग न्यूज: संत मुक्ताईंच्या आषाढी वारी पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान)
मंगळवारी (18 जून) सकाळी दहा वाजता अंकली येथील सरदार शितोळे यांच्या राजवाड्यात अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर मानाच्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शितोळे घराण्याची दिंडी आणि मानाचे अश्व यांनी आळंदीच्या दिशेने प्रस्थान ठेवला आहे. हे मानाचे अश्व बेळगाव अंकली ते आळंदी असा 18 जून ते 28 जून असा दहा दिवसांचा पायी प्रवास करत आळंदीमध्ये दाखल होणार आहेत. यानंतर आळंदीतील बिडकर वाड्यामध्ये त्यांचे पूजन केले जाईल. मुख्य प्रस्थानाच्या दिवशी हे अश्व संजीवन समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालतात आणि या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतील, अशी माहिती श्रीमंत उर्जितसिंहराजे शितोळे सरकार आणि त्यांचे वंशज कुमार महादजीराजे शितोळे सरकार यांनी दिलीय.
काय असते मानाच्या अश्वांचे महत्त्व?
माऊलींच्या पालखी रथापुढे दोन अश्व चालत असतात. यापैकी एक मुख्य मानाचा अश्व तर दुसरा ध्वजधारी यांचा अश्व असतो. मानाच्या अश्वाच्या शरीरावर असलेल्या शुभ खुणा, भवऱ्या, कंठावरील देव मणी, पायावरील पद्य अशा खुणा पाहून त्यांची निवड केली जाते. या अश्वांच्या पाठीवर जन्मल्यापासून कोणीही बसलेले नसते. हे अश्व राजवैभवाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळेच पालखी सोहळ्याला वैभव प्राप्त झाले आहे.
पालखी सोहळ्यामध्ये उभे आणि गोल रिंगण असते. याच रिंगण सोहळ्यात हे अश्व धावतात. त्यावेळेस कधी पुढे ध्वजधारी यांचा अश्व असतो तर कधी मानाचा अश्व पुढे असतो. ज्या ठिकाणाहून हे अश्व धावत असतात, त्या ठिकाणची माती वारकरी बांधव आपल्या भाळी लावतात. अशी आख्यायिका सांगितली जाते की या मानाच्या अश्वावर स्वतः संत ज्ञानेश्वर महाराज विराजमान होत असतात.