बीड: बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आणि् खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काल सकाळी वाल्मिक कराडने सीआयडीसमोर आत्मसमर्पण केले, त्यानंतर त्याच्यावरील कारवाईंना वेग आला.
बीडच्या केज न्यायालयामध्ये रात्री उशिरा झालेल्या सुनावणीत कोर्टाने खंडणी प्रकरणात कराड याची 14 दिवसाच्या सीआयडी कोठडीत रवानगी केली. या सुनावणीदरम्यान काय काय घडामोडी केल्या? सरकारी वकिलांनी नेमका काय युक्तीवाद केला? जाणून घ्या सविस्तर.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाल्मीक कराडला मंगळवारी रात्री 9.30 वाजता केज येथे आणण्यात आले. रात्री उशिरा येथील न्यायालयासमोर त्यास हजर केले असता न्यायाधीश पावसकर यांनी त्याला 15 दिवसांची म्हणजेच 31 डिसेंबर ते 14 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावली आहे. त्यानंतर रात्री वाल्मीक कराड याला बीडकडे रवाना करण्यात आले.
पुणे येथून घेऊन आलेल्या कराड याला सुरवातीला केज येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज हजारे यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर वाल्मीक कराडला केज पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि अधिकृत अटक करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर रात्री १०:४० वाजता त्याला केज येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
वाल्मीक कराड याची बाजू मांडण्यासाठी परळीचे ॲड. श्रीनिवास मुंडे हजर होते. तर केज न्यायालयातील सहायक सरकारी वकील ॲड. संतोष देशपांडे यांची याप्रकरणी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु त्यांनी त्याला नकार दिल्यामुळे ऐनवेळी ॲड. जे. बी. शिंदे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.
न्यायालयात सीआयडीने काय दावा केला?
संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणाचा संबंध आहे.
वाल्मीक कराडने आणखी किती गुन्हे करुन दहशत पसरवली आहे? याचा शोध घ्यायचा आहे.
सुदर्शन घुले हा वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा. तो खून प्रकरणातील आरोपी असून अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.
फोनमधील आवाज कराडचा आहे का, हे तपासायचे आहे. त्यासाठी कराडला १५ दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
न्यायालयात वाल्मिक कराडच्या वकिलांची बाजू:
वाल्मीक कराड हे सामाजिक कार्यकर्ते आहेत.
त्यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल झाला, त्यामुळे कोठडी मागणे चुकीचे आहे.
खंडणीचे पैसे घेतल्याचे पुरावे आहेत का? हत्या प्रकरणातही राजकीय द्वेषापोटी नाव राजकीय द्वेषापोटी भगोवण्यात आले.
आवाजाचे नमुने देण्यास ते तयार आहेत. पोलीस कोठडीची गरज नाही.
कराड शरण आले आहेत. त्यांना न्यायालयीन कोठडी द्या, असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला.