जाहिरात

SARATHI Scholarship : मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी!'सारथी' देणार शिक्षणासाठी मदत, असा करा अर्ज

SARATHI Scholarship : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था म्हणजेच सारथीने मराठा आणि कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

SARATHI Scholarship : मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी!'सारथी' देणार शिक्षणासाठी मदत, असा करा अर्ज
SARATHI Scholarship : उच्च शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील आर्थिक चिंतेचे सावट आता दूर झाले आहे.
मुंबई:

SARATHI Scholarship : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था म्हणजेच सारथीने मराठा आणि कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची विद्यार्थी प्रतीक्षा करत होते, तो क्षण अखेर उजाडला आहे. 

सारथीने 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठीच्या डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील आर्थिक चिंतेचे सावट आता पूर्णपणे दूर झाले आहे.'सकाळ' ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कुणाला होणार फायदा?

देशातील पहिल्या 200 अव्वल शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. विशेष म्हणजे 2025-26 हे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांवर कर्ज काढून शिक्षण घेण्याची किंवा फी भरण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली होती. 

वसतिगृह, खानावळ आणि महाविद्यालयाची फी भरताना होणारी ओढाताण आता या शिष्यवृत्तीमुळे थांबणार आहे. या योजनेंतर्गत पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका अशा पूर्णवेळ अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेले पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात.

( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचा रिजेक्ट झालेला अर्ज पुन्हा होईल मंजूर; फक्त फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स )

शिष्यवृत्तीचे नेमके स्वरूप काय

या योजनेच्या माध्यमातून एकूण 300 गुणवंत विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या संबंधित शिक्षण संस्थेचे संपूर्ण शिक्षण शुल्क सारथीमार्फत भरले जाईल. यामध्ये केवळ ट्यूशन फीच नाही, तर परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक आणि विकास शुल्काचाही समावेश करण्यात आला आहे. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी म्हणून पुस्तकांसाठी 5000 रुपये आणि इतर शैक्षणिक साहित्यासाठी 10000 रुपये अशी अतिरिक्त आर्थिक मदतही दिली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी शेवटची संधी

सारथीचे व्यवस्थापकीय संचालक सुरज मांढरे यांनी पात्र विद्यार्थ्यांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. 

विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात आणि आवश्यक सर्व कागदपत्रांसह आपले अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. योजनेच्या अधिक अटी, शर्ती आणि अर्जाच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सारथीच्या sarthi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

( नक्की वाचा : Pune News: पुणे मेट्रोचा धमाका! कॅम्प, पुलगेटमार्गे थेट उंड्री गाठता येणार, वाचा कुठून जाणार ट्रेन )

विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आनंद

जाहिरात प्रसिद्ध झाल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ही शिष्यवृत्ती आमच्या शिक्षणाचा एकमेव आधार होती. जाहिरात रखडल्याने प्रचंड मानसिक आणि आर्थिक दडपण आले होते, परंतु आता जाहिरात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सारथीच्या माध्यमातून अशा अनेक लोकोपयोगी योजनांना गती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com