सुजित आंबेकर, प्रतिनिधी
Satara Lok Sabha Election : सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणात शिंदे यांच्यासह 25 जणांवर कलम 409, 420, 406, 34 प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी शिंदे यांच्यावर शौचालय घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्यापाठोपाठ आणखी एका प्रकरणात शिंदे अडचणीत सापडले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्र पेटून उठेल
शशिकांत शिंदे यांच्या मदतीसाठी शरद पवार धावून आले आहेत. शिंदे यांना अटक झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या विरोधात रस्त्यावर उतरुन संघर्ष करतील, असा इशारा पवार यांनी दिला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत पवार बोलत होते. महायुतीमधील भारतीय जनता पक्षाकडून शिंदे यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप पवार यांनी केला.
( नक्की वाचा : साताऱ्यात 25 वर्षांमधील सर्वात मोठा बदल, पण परंपरा कायम राहणार का? )
साताऱ्यात प्रतिष्ठेची लढत
शरद पवार यांच्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून सातारकरांनी नेहमी शरद पवारांना साथ दिलीय. 2019 साली झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. आता उदयनराजे पुन्हा एकदा भाजपाच्या तिकीटावर उभे असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांचं आव्हान आहे.