- सातारा जिल्ह्यातील आरे-दरे गावात भारतीय सेनेचे जवान प्रमोद जाधव यांचा रस्ते अपघातात मृत्यू.
- पत्नीने अवघ्या आठ तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीसह पतीला अखेरचा निरोप दिला.
- साताऱ्यामध्ये जवानाचा अपघाती मृत्यू
- राहुल तपासे, प्रतिनिधी
Satara News: नशीब किती क्रूर असू शकतं, याचे अतिशय भयाण चित्र महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं. एका महिलेवर मुलीला जन्म दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच आपल्या पतीला अंतिम निरोप देण्याची वेळ आली. ओली बाळंतीण असलेली ही महिला स्ट्रेचरवर झोपलेल्या अवस्थेतच पतीच्या चितेपर्यंत पोहोचली आणि त्याच अवस्थेत तिने पतीच्या चेहऱ्यावरून शेवटचा हात फिरवला. तिच्या शेजारी उभी असलेली दुसरी महिला अवघ्या आठ तासांपूर्वी जन्मलेल्या लेकीला कुशीत घेऊन उभी होती. हा क्षण अतिशय हादरवणारा होता, प्रत्येकाच्याच डोळ्यांत अश्रू तरळले होते.
सातारा जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना
मन पिळवटून टाकणारी ही घटना महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आरे-दरे गावामध्ये घडलीय. जेथे भारतीय सेनेचे जवान प्रमोद जाधव यांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला. प्रमोद यांच्या पत्नी गर्भवती होत्या, बाळाच्या जन्मावेळी स्वतः उपस्थित असावं म्हणून प्रमोद यांनी रजा घेतली होती. पण कुटुंबाला भेटण्यासाठी येण्याचा निर्णय घेऊन प्रमोद इतक्या दूर निघून जातील की पुन्हा कधीच येणारच नाहीत, असे काही गंभीर घडेल याची कोणीच कल्पना केली नसावी.
सातारा तालुक्यातील दरे परिसरात झालेल्या एका रस्ते अपघातात प्रमोद जाधव यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अवघ्या काही तासांत त्यांच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला. वडील होण्याचा आनंद अनुभवण्यापूर्वीच प्रमोद जाधव यांना जगाचा निरोप घेतला. आनंदाचा क्षण काही वेळातच दुःखात बदलला.
नवजात मुलीसह पत्नीने पतीला दिला अखेरचा निरोप
प्रमोद जाधव यांच्या पार्थिवावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पण अंतिम निरोपाच्या वेळी तो क्षण प्रत्येकाचं मन हेलावून टाकणारा होता, जेव्हा अवघ्या आठ तासांच्या नवजात मुलीसह पत्नीने पतीला शेवटचा निरोप दिला. आईच्या डोळ्यांत अश्रू, कुशीत निष्पाप बाळ आणि समोर देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या पतीचं पार्थिव शरीर हे दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकाचेच डोळे भरून आले होते.