राहुल तपासे
सध्या पावसाचे दिवस आहेत. शेतकरी शेताच्या कामात व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी पेरणीचे काम सुरू आहे. कोकण आणि घाट पट्टात भात लागवड केली जाते. काही भाग हा सपाटीवर आहे तर काही भाग जंगलाचा आहे. मात्र तिथे शेती असल्याने शेतकरी शेती करतात. पण साताऱ्या जिल्ह्यातील तीन गावात सध्या दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांवर घरात बसण्याची वेळ आली आहे. या भीतीचे ही कारण तसेच आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गावकरी आता एकजुट झाले आहेत.
सातारा जिल्ह्यातील करवडी गावात पिसाळलेल्या कोल्ह्यांची दहशत आहे. त्यांनी इतकी दहशता माजवली आहे की त्याचा धसका गावकऱ्यांनी घेतला आहे. या पिसाळलेल्या कोल्ह्यांच्या हल्ल्यात दोन गावकरी जखमी झाले आहेत. या गावकऱ्यांना कोल्ह्यांनी चावा घेतला आहे. भटकी, खंडोबा आणि काळवट परिसरात या कोल्ह्यांची दहशत आहे. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार तीन ते चार पिसाळलेले कोल्हे या भागात मुक्त पणे फिरत आहे. याची तक्रार गावकऱ्यांनी वन विभागाला केली.
नक्की वाचा - Malshej Ghat: माळशेज घाटात रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद! काय आहेत पर्यायी मार्ग?
ही माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे पथक तातडीने गावात दाखल झाले होते. वन अधिकाऱ्यांनी आणि अमित डुबल यांच्या सहकार्याने संपूर्ण शिवारात शोधमोहीम राबवली गेली. मात्र दाट झाडी आणि डोंगराळ परिसरामुळे कोल्ह्यांना पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. तरी ही शोध माहिम राबवली जात आहे. गावकऱ्यांच्या संरक्षणासाठी शक्य तितके उपाय केले जात आहे. मात्र घनदाट जंगल, त्यात पाऊस यामुळे या शोध मोहीमेत अडचण येत आहे. शिवाय एका पेक्षा जास्त कोल्हे असल्याने ही वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. तरीही वन विभाग गाकऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर गावातील गावकऱ्यांनी शेतात काम करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय बाहेर जाताना किंवा शेतात जाताना एकटे जाऊ नये असं ही सांगितलं गेलं आहे. जरी कोणाला कोल्हा दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वन विभागाने परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. शिवाय या पिसाळलेल्या कोल्ह्यांचा शोध सुरू आहे. गावकऱ्यांनी घाबरून जावू नये असे आवाहन ही करण्यात आले आहे.