Satara News: ऑपरेशन तारा! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबातील वाघीण ‘तारा’ची एन्ट्री,आता या पुढे...

संपूर्ण मोहीम भारतीय वन्यजीव संस्था (WII) यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins
सातारा:

राहुल तपासे 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी एक ऐतिहासिक घटना घडली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून चंदा नावाच्या वाघीणीचे सह्याद्रीत यशस्वी पुनर्स्थापन करण्यात आले आहे. या व्याघ्र प्रकल्पात  तिचे नवे नाव ‘तारा (STR T 04)' असे ठेवण्यात आले आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या मंजुरीनंतर महाराष्ट्र वन विभागाने “ऑपरेशन तारा” अंतर्गत ही संवेदनशील मोहीम पूर्ण केली. त्यामुळे या पुढच्या काळात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची आता एक वेगळी ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे.  

तीन वर्षांची ही वाघीण NTCA च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांनुसार ताडोब्यातील खडसांगी परिक्षेत्रातून पकडण्यात आली आहे. वैद्यकीय तपासण्या आणि सुरक्षा प्रोटोकॉलनंतर तिला विशेष वन्यजीव वाहतुकीच्या वाहनातून चांदोलीकडे आणण्यात आले.12 नोव्हेंबर ला 4 वाजता मोहीम सुरू झाली. त्यानंतर पाच वाजता वाघीण पकडली गेली. रात्री दहा वाजता तिला कराडकडे मार्गस्थ करण्यात आले. जवळपास एक हजार किलोमीटरचा 27 तासांचा प्रदीर्घ प्रवास करून ही वाघीण शुक्रवारी पहाटे चांदोली येथे सुरक्षित दाखल झाली. त्यानंतर पुन्हा वैद्यकीय तपासण्या घेऊन पहाटे 3.20 वाजता सोनारली येथील एनक्लोजरमध्ये “सॉफ्ट रिलीज” करण्यात आले.

नक्की वाचा - Pankaja Munde PA: पत्नीच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेचा पहिला फोन पंकजा मुंडेंना, चर्चा काय झाली?

संपूर्ण मोहीम भारतीय वन्यजीव संस्था (WII) यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या स्थानांतरण मोहिमेत क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, विभागीय वनाधिकारी स्न्हेलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, बाबासाहेब हाके, वनक्षेत्रपाल ऋषीकेश पाटील, प्रदीप कोकितकर, किरण माने, संग्राम गोडसे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, संशोधक आकाश पाटील आणि संपूर्ण पथकाने मोलाचे योगदान दिले. विशेषतः संग्राम गोडसे आणि संशोधक आकाश पाटील यांनी वाघीण निवडीपासून पकड आणि सुरक्षित स्थलांतरणापर्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

नक्की वाचा - D Mart News: डी मार्टमध्ये 'या' दिवशी मिळतं सर्वात स्वस्त सामान, त्यामागचं कारणं ऐकून तुम्ही ही खूश व्हाल

Advertisement

क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले की, “ऑपरेशन तारा हा सह्याद्रीसाठी ऐतिहासिक पुढचा टप्पा आहे. सॉफ्ट रिलीजमुळे वैज्ञानिक पुनर्स्थापनाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून सातत्यपूर्ण निरीक्षणाद्वारे सह्याद्रीला सक्षम व्याघ्र अधिवास बनवण्याचे कार्य सुरू राहील. महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक एम. एस. रेड्डी यांनी या स्थानांतरणाचे कौतुक करताना म्हटले की, “ताडोबा आणि सह्याद्रीच्या टीमचे वैज्ञानिक व समन्वित काम अभिनंदनास पात्र आहे. हे पुनर्स्थापन हा सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धनासाठी महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या उपस्थितीसाठी "तारा"चा प्रवेश हा केवळ पुनर्स्थापना कार्यक्रम नसून विभागाच्या दीर्घकालीन व्याघ्र संवर्धनाच्या धोरणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.