राहुल तपासे
सज्जनगडावर जायचे असेल तर आता महिलांना स्टायलिश कपडे घालून जाता येणार नाही. ज्या महिला तोकडे कपडे घालून येतील त्यांना सज्जनगडावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा निर्णय श्री रामदास स्वामी संस्थानने घेतला आहे. धार्मिक परंपरेचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या निर्णयामुळे नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या पुढच्या काळात महिलांना तोकडे कपडे घालून सज्जनगडावर जाता येणार नाही.
स्टायलिश कपडे म्हणजे काय याची व्याख्याही संस्थानच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आली आहे. त्यात महिला, मुलींनी सज्जनगडावर येताना शॉर्ट पॅन्ट, शॉर्ट ड्रेस, स्लीव्हलेस ड्रेस घालून येवू नये. हे कपडे स्टायलिश कपड्यांमध्ये गणले जाणार आहेत. या निर्णया बाबत तिव्र प्रतिक्रीया उमटण्याची ही दाट शक्यता आहे. महिला संघटना या निर्णयाबाबत काय भूमीका घेतात हे काही दिवसात स्पष्ट होईल. सज्जनगड हे समर्थ रामदास स्वामींचे समाधीस्थान आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. परंतु, अलीकडच्या काळात काही पर्यटकांकडून ‘गडाच्या पवित्र वातावरणाला बाधा' येईल अशा वेशभूषेत फोटोसेशन व व्हिडिओ शूटिंग केल्याच्या तक्रारी संस्थानकडे वारंवार येत होत्या. त्यानंतर या तक्रारींना गांभीर्याने घेत संस्थानाने महिलांच्या पोशाखासंदर्भात नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
संस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतलेल्या या निर्णयानुसार सज्जनगडावर येणाऱ्या महिला, मुलींनी शॉर्ट पॅन्ट, स्लीव्हलेस, शॉर्ट ड्रेस यांसारखे कपडे परिधान करणे टाळावे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांना गडावर प्रवेश नाकारला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. पुरूषांना बर्मुडा आणि शॉर्ट पॅंटवर गडावर प्रवेश नाकारण्यात येणार आहे. संस्थानकडून या निर्णयाचे स्वागत करत अनेक भाविकांनी धार्मिक स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी असे नियम आवश्यक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तथापि, काही तरुणी आणि पर्यटक वर्गातून मात्र या निर्णयाबाबत नाराजीचा सुर उमटत आहे. सज्जनगड हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास स्वामींचे समाधीस्थान असे सांगितले जाते., येथे दरवर्षी रामनवमी, दास नवमीसह विविध धार्मिक उत्सवांना भाविकांची प्रचंड गर्दी होते. अशा पार्श्वभूमीवर गडाचे धार्मिक वातावरण, आचारसंहिता आणि परंपरेचे पालन व्हावे यासाठी संस्थानाने घेतलेला हा निर्णय सध्या साताऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
सज्जनगड साताऱ्यापासून जवळ आहे. इथं समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांच्या आयुष्यातील अखेरचे 18 वर्ष या गडावर वास्तव्य केले. इ.स. 1682 मध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी याच ठिकाणी समाधी घेतली आहे. त्यांची समाधी आणि मठ गडावर आहे. गडावर श्री रामाचे मंदिर आहे. या मंदिराजवळच समर्थांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय ही आहे. जिथे त्यांचा पलंग, कुबड्या, पाण्याचा तांब्या अशा वस्तू जतन केल्या आहेत. इथं श्री रामदास स्वामी संस्थानतर्फे येथे दररोज काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत नित्य धार्मिक कार्यक्रम आणि दासनवमी (समर्थांचा पुण्यतिथी उत्सव) सारखे मोठे उत्सव साजरे होतात.