जाहिरात

Satish Bhosale: 'खोक्या भाई'चं पार्सल प्रयागराजहून बीडमध्ये आणलं, पुणे ते युपी, कुठे कुठे लपला?

Satish Bhosale Khokya Bhai Arrested: अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली असून त्याला आज महाराष्ट्रामध्ये आणण्यात आले आहे. 

Satish Bhosale:  'खोक्या भाई'चं पार्सल प्रयागराजहून बीडमध्ये आणलं,  पुणे ते युपी, कुठे कुठे लपला?

मोसीन शेख, बीड: मारहाण आणि शिकारीच्या आरोपांमधील आरोपी  खोक्या उर्फ सतीश भोसले हा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे, त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. शिरूरमध्ये ढाकणे कुटुंबातील वडील आणि मुलाला बेदम मारहाण केल्यापासून तो फरार होता. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली असून त्याला आज महाराष्ट्रामध्ये आणण्यात आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती ्अशी की, बीडमध्ये मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खोक्या उर्फ सतीश भोसले चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर खोक्या भाईचे अनेक प्रताप समोर आले होते. मारहाण, शिकार तसेच घरामध्ये गांजा सापडल्यामुळे खोक्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर तो फरार झाला होता. दोन दिवसांपूर्वी खोक्याला उत्तरप्रदेश आणि बीड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला प्रयागराजमधून बेड्या ठोकल्या आहेत. 

खोक्या उर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी प्रयागराजमध्ये बेड्या ठोकल्यानंतर त्याला आज महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. आधी मुंबई आणि त्यानंतर छत्रपती संभाजी नगरला खोक्याला विमानाने आणण्यात आले.  संभाजीनगरहून आता बीड पोलीस बाय रोड त्याला शिरुरकडे घेऊन गेले असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

( नक्की वाचा : 'भारतीय क्रिकेटपटूचे वडील घेत होते धर्मांतराचे कार्यक्रम', क्लबनं केली खेळाडूवर कारवाई )

मारहाणीचे आणि पैसे उधळल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खोक्यावर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर खोक्या फरार झाला. सर्वप्रथम तो अहिल्यानगरला गेला तिथून पुणे आणि पुन्हा छत्रपती संभाजीनगरला आला. त्यानंतर तो ट्रॅव्हल्सने प्रयागराजला गेला. प्रयागराजमध्ये उतरून लपण्याच्या तयारीत असतानाच त्याला युपी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 

दरम्यान, सतीश भोसलेच्या घरावरही वन विभागाने मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्याचे घर स्वतःच्या मालकीच्या जागेवर नसून वनविभागाच्या हद्दीमध्ये असल्याचं समोर आलं आहे, या प्रकरणात त्याच्यावर वनविभागानं गुन्हा दाखल केला होता.अखेर आता वनविभागाकडून त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. त्याचं घर पाडण्यात आलं आहे. यापूर्वीच त्याला नोटीस देखील देण्यात आली होती.