ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन!

सुप्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक लेखक डॉ. सुधीर रसाळ यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

सुप्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक लेखक डॉ. सुधीर रसाळ यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या देशातील 24 भाषांतील साहित्यिकांना देण्यात येतो. मराठी भाषेसाठी 2024 साहित्य अकादमी पुरस्कार डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर झाला आहे.  ‘विंदांचे गद्यरूप' याचे समीक्षण असलेल्या 'कवितायन' या पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारामुळे आनंद झाला असून आतापर्यंतचा हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याचे रसाळ म्हणाले आहेत.

साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं आहे. या पुरस्कारामुळे मराठी समीक्षा क्षेत्रातील एका व्रतस्थ साहित्यिकाचा सन्मान होत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय साहित्य संस्थेच्यावतीने साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यात डॉ. रसाळ यांच्या ‘विंदांचे गद्यरूप' या समीक्षात्मक पुस्तकाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नक्की वाचा - शिवरायांची भूमिका साकारणार 'हा' साऊथ सुपरस्टार, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही ठरली

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणाले, डॉ रसाळ यांचे मराठी साहित्य विश्वातील अमूल्य योगदान आहे. मराठी भाषेचे अध्यापन, संशोधन, संपादन आणि समीक्षा असा त्यांचा चौफेर विहार राहिला आहे. विशेषतः त्यांचे मराठी काव्यविषयक संशोधनात्मक लेखन मौलिक असे आहे. समीक्षेतून कठीण विषय सहज-सुलभपणे समजावून देणारी त्यांची शैली नवोदितांना आश्वासक वाटते, यातच त्यांचे मोठेपण आहे.

मराठी भाषा जतन, संवर्धन तसेच साहित्य विषयक चळवळीतील संस्था, समित्यांवरही डॉ. रसाळ सक्रीयपणे कार्यरत आहेत. त्यांच्या समीक्षात्मक लेखनाला राष्ट्रीयस्तरावर मिळालेली ही दाद नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. डॉ. रसाळ आजही तितक्याच तडफेने लेखन, संशोधनात कार्यरत आहेत. त्यांच्या हातून यापुढेही मराठी साहित्याची अशीच अखंडित सेवा घडत राहो. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो या शुभेच्छांसह मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. रसाळ यांचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

सुधीर रसाळ यांची साहित्यसंपदा...

पु.शि. रेगे यांची समग्र कविता

नव्या वाटा शोधणारे कवी

वाड्मयीन संस्कृती

समीक्षक भालचंद्र नेमाडे

समीक्षा आणि समीक्षक

मर्ढेकरांची कविता - आकलन आणि विश्लेषण

माणसं जिव्हाळ्याची

एक नाटककार आणि काही नाटके

काव्यालोचना

पार्थिवपूजक पु. शि. रेगे

कविता आणि प्रतिमा

ना. घ. देशपांडे

वाड्मयीन युगान्तर आणि श्री.पु. भागवत

विंदांचे गद्यरुप